
वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनव्हिडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेनसन हुआंग यांचे चीनच्या कथित गुप्तहेर महिलेशी असलेल्या संबंधांबाबतच्या प्रकरणाला फारसे महत्त्व दिलेले नाही. या प्रकरणासंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी तयार केलेला गोपनीय अहवाल आपण वाचला होता की नाही, याचीही ट्रम्प यांनी स्पष्ट आठवण नसल्याचे सांगितले.
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना या गोपनीय अहवालाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी याबाबत गुप्तचर अधिकाऱ्यांकडून नक्कीच माहिती घेईन. कदाचित या विषयाचा उल्लेख झाला असेल; मात्र त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही.
वृत्तानुसार, मार्को रुबिओ यांनी गेल्या वर्षी एक गोपनीय अहवाल तयार करण्याची प्रक्रिया पाहिली होती. या अहवालात एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या अॅलिस हुआंग (हुआंग ले) या महिलेशी जवळचे संबंध असल्याचा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना ही महिला चीनच्या सरकारी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचा संशय होता.ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी हा अहवाल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रसारित करण्यात आल्याचे वृत्त आहे. या महिलेच्या माध्यमातून एनव्हिडियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसेच चीनला होणाऱ्या चिप्सच्या निर्यातीबाबत कंपनीच्या भूमिकेवर प्रभाव टाकला जाऊ शकतो, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, ट्रम्प यांनी जेनसन हुआंग यांची पाठराखण केली आहे. आपण हुआंग यांच्याशी बोललो असून, संबंधित महिला चीनची गुप्तहेर असल्याची माहिती त्यांना होती का, असा थेट प्रश्न विचारल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यावर हुआंग यांनी आपल्याला ती महिला गुप्तहेर असल्याची अजिबात कल्पना नव्हती, असे उत्तर दिले. हुआंग यांच्या या स्पष्टीकरणावर आपला विश्वास असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यांनी हुआंग यांना एक सन्माननीय व्यावसायिक असेही संबोधले.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, जेनसन हुआंग यांनी विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी पत्नी आणि कुटुंबीयांची जाहीर माफीही मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनव्हिडियाच्या स्वतंत्र संचालकांची समिती स्थापन करण्यात आली असून, बाहेरील कायदेशीर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. या चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे हुआंग यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींची अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय चौकशी करत आहे. अॅलिस हुआंग ही सिंगापूरस्थित मेगास्पीड इंटरनॅशनल या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक होती. या कंपनीचे एनव्हिडियाशी व्यावसायिक संबंध होते. या कंपनीने एनव्हिडियाकडून सुमारे दोन अब्ज डॉलर किमतीची उत्पादने खरेदी केल्याचे वृत्त आहे.एनव्हिडियाच्या प्रगत चिप्सची बेकायदेशीरपणे चीनमध्ये निर्यात करण्यात आली होती का, याचाही अमेरिकेचे अधिकारी तपास करत आहेत. या प्रकरणामुळे अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित संवेदनशील माहिती चीनच्या हाती जाण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जेनसन हुआंग यांनी यापूर्वी चीनला एनव्हिडियाच्या प्रगत चिप्सची निर्यात करण्यावरील निर्बंध शिथिल करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, चीनने या गुप्तहेरगिरीच्या आरोपांचे खंडन केले आहे. हे आरोप निराधार असून चीनची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक मोहीम राबवली जात असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode