
ढाका, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. फरिदपूरमध्ये सोमवारी पहाटे काही अज्ञात समाजकंटकांनी उभ्या असलेल्या बसला आग लावली. या आगीत बसमध्ये झोपलेल्या ६० वर्षीय चालकाचा होरपळून मृत्यू झाला. यादरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ आणि बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या.
बांगलादेशमधील वृत्तपत्रानुसार, मृत बसचालकाची ओळख मोहम्मद कालाचन शेख अशी झाली आहे.ढाका, सावर आणि गाझीपूर येथेही अनेक बस पेटवून देण्यात आल्या. संपूर्ण बांगलादेशात सुरू असलेल्या जाळपोळ आणि बॉम्बस्फोटांच्या घटनांच्या मालिकेचाच हा भाग असल्याचे सांगितले जात आहे.फरिदपूरमधील गोलचामत नवीन बसस्थानकाजवळ बसचालक मोहम्मद कालाचन हे एका बसमध्ये झोपले होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी बसला आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बसमधून बाहेर काढून फरिदपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बांगलादेशमध्येच घडलेल्या अन्य एका घटनेत सोमवारी रात्री झेनैदाह येथे इस्लामिक विद्यापीठाच्या सुमारे ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या डबलडेकर बसवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.‘दिगंता’ नावाची ही बस विद्यापीठाच्या परिसराकडे जात असताना शैलकुपा उपजिल्ह्यातील ड्रॅगन बागान परिसरात हा हल्ला झाला. वृत्तानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ढाक्यातील मोहम्मदपूर परिसरात सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता टोकियो स्क्वेअरसमोर दोन बॉम्बस्फोट झाले. या घटनांमागील आरोपींची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय, रात्री सुमारे ९.३० वाजता मीरपूर-११ पोस्ट ऑफिससमोर ‘बसुमती परिवहन’च्या एका बसला आग लावण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. वृत्तानुसार, सोमवारी सावर, ढाका आणि गाझीपूर येथे एकूण सहा बस पेटवून देण्यात आल्या. सावरमध्ये ढाका-अरिचा महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या दोन बसना रात्री १ वाजता आणि पहाटे ४ वाजता आग लावण्यात आली. गेंडा आणि बालियारपूर परिसरात या घटना घडल्या.यापैकी एका बसचा वापर वस्त्रोद्योग कारखान्यातील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी केला जात होता, तर दुसरी बस ‘इतिहास परिवहन’ची होती. आगीमुळे दोन्ही बसमधील आसने आणि अंतर्गत भाग जळून खाक झाले.
ढाक्यातील फार्मगेट मेट्रो स्थानकाखाली संध्याकाळच्या सुमारास ‘लव्हली परिवहन’च्या एका बसला आग लावण्यात आली.तर मीरपूर-११ येथे मेट्रो रेल्वे मार्गाखाली रात्री सुमारे ९.१५ वाजता ‘बसुमती परिवहन’च्या आणखी एका बसला आग लावण्यात आली. गाझीपूर जिल्ह्यातील कालियाकैर उपजिल्ह्यात ढाका-टांगाईल महामार्गाजवळील चंद्रा परिसरात उभ्या असलेल्या दोन बसही पेटवून देण्यात आल्या.
दरम्यान, ढाक्यातील अनेक भागांमध्ये देशी बनावटीचे बॉम्ब (क्रूड बॉम्ब) फुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. बनश्री, मोहाखाली, ढाका विद्यापीठ परिसर आणि मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाबाहेरील परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ढाका महानगर पोलिसांनी (डीएमपी) सोमवारी राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी १६० नवीन तपासणी नाके उभारले. तसेच पुढील हिंसक घटना रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. डीएमपीचे माध्यम विभागाचे उपआयुक्त अख्तर हुसेन यांनी माध्यमांना सांगितले की, अलीकडे झालेल्या बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी गेल्या २४ तासांत किमान १९ जणांना अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode