
पॅरिस, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।फ्रान्समध्ये महागाई आणि शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियावर बनावट पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आले. युरोपीय महासंघाच्या (ईयू) एका अंतर्गत अहवालानुसार, रशियाशी संबंधित नेटवर्कने स्थलांतरितांविरोधात द्वेष पसरवून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न केला.याशिवाय, इस्रायल आणि अमेरिकेतील ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मॅगा) चळवळीशी संबंधित समाजमाध्यमांवरील खात्यांनीही या निदर्शनांबाबत चुकीची माहिती पसरवली.
फ्रान्स सरकारची प्रतिमा कमकुवत करणे हा या मोहिमेमागील उद्देश होता. मात्र, या नेटवर्कने निदर्शने घडवून आणली नाहीत, तर आधीपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा घेतला. रशियाशी संबंधित नेटवर्कने समाजमाध्यमांवर अनेक खोटे दावे प्रसारित केले. यामध्ये स्थलांतरितांकडून निदर्शकांवर बलात्कार होत असल्याचे तसेच देशात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचे दावे करण्यात आले. या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती आणि स्थलांतरितांविरोधात संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रशियासमर्थक गटांच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० पोस्टना एकूण २८ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले.याच काळात अमेरिकेतील ‘मॅगा’ चळवळीशी संबंधित व्यक्तींच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० पोस्टना ४.९ कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले. त्याचप्रमाणे, इस्रायली अधिकारी, सरकारी खाती आणि प्रभावशाली व्यक्तींनी केलेल्या अशाच १० पोस्टना ३.५ कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले.‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मॅगा) ही अमेरिकेतील उजव्या विचारसरणीची चळवळ असून, ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देते.
दरम्यान, फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी देशात सातत्याने सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उद्योग संघटना आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.या बैठकीत नागरिकांची क्रयशक्ती वाढवणे आणि वेतनाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार किमान वेतनात पुन्हा एकदा वाढ करण्याचा विचार करत आहे.
जगभरातील हिंसाचार आणि विरोधी निदर्शनांवर लक्ष ठेवणाऱ्या एसीएलईडी या संस्थेच्या आकडेवारीनुसार, १५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत युरोपातील ३१ देशांमध्ये महागाई आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांवरून १,७०० हून अधिक निदर्शने झाली. या आंदोलनांची सुरुवात फ्रान्समधून झाली होती.फ्रान्समध्ये महागाई आणि शिक्षण व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष रस्त्यावर उतरला. त्यानंतर या आंदोलनाचे लोण स्पेन आणि इटलीसारख्या देशांमध्येही पसरले.या देशांमध्ये हजारो नागरिकांनी घरांच्या वाढत्या किमती आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या महागाईविरोधात निदर्शने केली. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या आर्थिक अडचणी अनेक देशांतील सरकारांसमोर मोठे आव्हान ठरत आहेत.युरोपातील अनेक देशांमध्ये येत्या काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
स्पेनमध्ये कामगार संघटनांनी ११ नोव्हेंबर रोजी संप पुकारला आहे. दरम्यान, इटलीतील सर्वात मोठ्या कामगार संघटनेने महागाईच्या विरोधात २० नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.याशिवाय जर्मनी, पोर्तुगाल आणि अल्बेनियामध्येही आगामी काळात निदर्शने अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode