‘चित्रपताका’ महोत्सवाच्या प्रेक्षक नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मराठी सिनेप्रेमींचा वाढता सहभाग
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका - २०२६’ या मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षक नोंदणीला उत
मुंबई


मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका - २०२६’ या मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षक नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवाबाबत चित्रपटप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी महोत्सवाच्या www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

यंदा १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणाऱ्या ‘चित्रपताका’ महोत्सवात ३३ मराठी चित्रपटांसह विविध विषयांवरील ७ परिसंवाद, ७ कार्यशाळा, ५ मुलाखती व अन्य उपक्रमांची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. महोत्सवात जुन्या आणि नव्या मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असून, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. या चार दिवसीय महोत्सवाचे नोंदणी शुल्क केवळ १०० रुपये ठेवण्यात आले असून, या नोंदणी शुल्कातून जमा होणारे संपूर्ण उत्पन्न दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट महोत्सवात सहभागी होताना प्रेक्षकांना मराठी चित्रपटांचा आनंद घेण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपता येणार आहे.

यंदा महोत्सवपूर्व नोंदणीस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध असलेल्या नोंदणी प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी नावनोंदणी केली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://tktplz.events/gject6-chitrapataka-marathi-film-festival या अधिकृत संकेतस्थळ दुव्यावरून नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande