
रामपुरी कॅम्पमधील दुर्घटना; सेंट्रिंगसह बीम कोसळल्याने मजूर मलब्याखाली दबले
अमरावती, ११ नोव्हेंबर (हिं.स.) : शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात निर्माणाधीन काँक्रीट प्रवेशद्वाराचा बीम सेंट्रिंगसह अचानक कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत चार मजूर जखमी झाले असून, त्यांना मलब्याखालून बाहेर काढण्यात आले. ऐन काम अंतिम टप्प्यात असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
रामपुरी कॅम्प मुख्य मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे २२ फूट उंच आणि २० फूट रुंदीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते. या प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूंचे काँक्रीट पिलर तयार झाले होते. मंगळवारी या पिलरना वरच्या बाजूने जोडण्यासाठी बीम टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
सकाळपासून सुमारे १२ ते १५ मजूर बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम करीत होते. सुमारे २२ फूट उंचीवर हे काम सुरू असल्याने मजुरांच्या उभे राहण्यासाठी तात्पुरती चैली (जुगाड) तयार करण्यात आली होती. तसेच बीमला सेंट्रिंग लावण्यात आले होते. दिवसभर काम सुरळीत सुरू होते. सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना अचानक संपूर्ण बीम सेंट्रिंगसह खाली कोसळला.
या वेळी चैलीवर उभे राहून काम करणारे मजूर काँक्रीटच्या मलब्यासह खाली आदळले. या दुर्घटनेत मो. ऐफाज (२६), जमीर खान समशेर खान (३५), शेख मुजफ्फर शेख बब्बू (२४) आणि शेख जमीर हे चार मजूर जखमी झाले. हे सर्व मजूर नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पाच ते सहा घमेली काँक्रीट भरणे बाकी असतानाच दुर्घटना
प्रत्यक्षदर्शी कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम सुरू असताना सुमारे पाच मजूर चैलीवर उभे होते. अवघे पाच ते सहा घमेली काँक्रीट भरणे बाकी असतानाच अचानक बीम कोसळला. काही कामगार अंतरावर असल्याने त्यांनी वेळीच मागे सरकत स्वतःचा बचाव केला. मात्र, चैलीवर उभे असलेले त्यांचे चार ते पाच सहकारी मलबा आणि सेंट्रिंगखाली दबले गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मुख्य मार्गावर नागरिकांची गर्दी
दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मोठी गर्दी जमली. बाबा कॉर्नर ते रामपुरी कॅम्पमार्गे विलासनगरला जोडणाऱ्या मुख्य मार्गालगत हे प्रवेशद्वार उभारण्यात येत असल्याने दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. खबरदारी म्हणून मुख्य मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला.
निर्माणाधीन प्रवेशद्वाराचा बीम नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, बांधकामातील सेंट्रिंग व आधारव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकामातील संभाव्य त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी