
अमरावती, ११ नोव्हेंबर (हिं.स.) : मोर्शी आणि वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये बोअरवेल खोदण्यावरील तसेच विहिरी खोल करण्यावरील बंदी उठविण्यात आली असून, ही परवानगी १५ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, ही सवलत केवळ संत्रा बागा असलेल्या क्षेत्रापुरती मर्यादित राहणार असून, संबंधित कामांवर शासनाचे नियंत्रण आणि देखरेख राहणार आहे.
मोर्शी आणि वरुड तालुक्यांतील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने भूजल सर्वेक्षण विभागाने या परिसराचा समावेश ‘ड्राय झोन’मध्ये केला होता. त्यामुळे या भागात बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संत्रा बागांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. पाण्याअभावी फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदण्यास आणि जुन्या विहिरी खोल करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.वरुड-मोर्शीचे आमदार उमेश ऊर्फ चंदूभाऊ यावलकर यांनी हा प्रश्न पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. पालकमंत्री बावनकुळे यांनीही संत्रा उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन परवानगी देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंदी उठविण्याचा निर्णय जाहीर केला.
पावणे दोन कोटी संत्रा झाडांना दिलासा
मोर्शी आणि वरुड या दोन्ही तालुक्यांत सुमारे पावणे दोन कोटी संत्र्याची झाडे असून, ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात संत्रा बागा आहेत. विदर्भातील संत्रा उत्पादनाच्या दृष्टीने या दोन्ही तालुक्यांना विशेष महत्त्व आहे. पाण्याअभावी या फळबागा धोक्यात येऊ नयेत, यासाठी मर्यादित कालावधीकरिता बोअरवेल खोदण्याची आणि विहिरी खोल करण्याची परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शासनाच्या निर्णयामुळे संत्रा बागा वाचविण्यासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश १२ नोव्हेंबरला अपेक्षित
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर नागपूर जिल्हा प्रशासनाने तेथील संत्रा बागांसाठी परवानगीसंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्याच धर्तीवर अमरावतीचे जिल्हाधिकारी १२ नोव्हेंबर रोजी याबाबत आदेश जारी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या सोयीनुसार बोअरवेल खोदणे आणि विहिरी खोल करण्याची कामे सुरू करता येतील.शासन आणि प्रशासनाचे आभार. जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकृत आदेश जारी झाल्यानंतर संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या सोयीनुसार कामे सुरू करतील, अशी प्रतिक्रिया आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी व्यक्त केली.या निर्णयामुळे मोर्शी आणि वरुड तालुक्यांतील संत्रा उत्पादकांना हंगामात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी