कमोडिटी बाजारात सोने-चांदी आणि कच्च्या तेलात तेजी; औद्योगिक धातूंच्या व्यवहारात संमिश्र कल
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत कमोडिटी बाजारात (मल्टी कमोडिटी एक्सचेंज – एमसीएक्स) आज सुरुवातीच्या सत्रात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने आज सराफा बाजारात प्रत्यक्ष सोने दरात घसरणीचा कल असतानाही कमोडिटी बाजारात स
MCX Morning Session Trading


नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत कमोडिटी बाजारात (मल्टी कमोडिटी एक्सचेंज – एमसीएक्स) आज सुरुवातीच्या सत्रात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने आज सराफा बाजारात प्रत्यक्ष सोने दरात घसरणीचा कल असतानाही कमोडिटी बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे व्यवहार तेजीसह सुरू आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही किंचित सुधारणा नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, औद्योगिक धातू अर्थात बेस मेटल विभागात आज संमिश्र कल पाहायला मिळत आहे.

सराफा बाजाराबाबत बोलायचे झाल्यास, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याचे वायदे दर १,३६५ रुपयांनी म्हणजेच जवळपास १ टक्क्याने वाढून १ लाख ४१ हजार ८९० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर व्यवहार करताना दिसले. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही जोरदार तेजी नोंदवण्यात आली आहे. सध्या चांदीचे वायदे दर ४,९२५ रुपयांनी म्हणजेच २.७० टक्क्यांनी मोठी झेप घेत १ लाख ८७ हजार ५०१ रुपये प्रति किलोग्रॅम या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

ऊर्जा बाजार आणि कच्च्या तेलाच्या विभागात मागील सत्रातील मोठ्या घसरणीनंतर आज सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. मध्य आशियात व्यापारी जहाजे आणि तेलवाहू टँकरवर झालेल्या ताज्या हल्ल्यांच्या वृत्तामुळे अमेरिका-इराण संघर्ष लवकर संपण्याच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रमुख ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत आज सकाळी १.११ टक्क्यांची वाढ होऊन त्याचा दर ९२.५० डॉलर प्रति बॅरल या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे कच्चे तेल अर्थात वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय) याच्या दरातही वाढ झाली असून, तो ८६ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारातही कमोडिटी एक्सचेंजवर ब्रेंट कच्च्या तेलाचा दर सुमारे ८,०९० रुपये प्रति बॅरलच्या आसपास आहे.

दुसरीकडे, औद्योगिक धातू अर्थात बेस मेटल विभागात आज वेगवेगळे कल पाहायला मिळत आहेत. कमोडिटी एक्सचेंजवरील सुरुवातीच्या व्यवहारात तांब्याच्या दरात मजबुती दिसून येत आहे. तांब्याचे वायदे दर ८.१५ रुपयांनी म्हणजेच ०.६१ टक्क्यांनी वाढून १,३४५.४५ रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहेत. याउलट, ॲल्युमिनियमच्या दरावर आज विक्रीचा दबाव दिसून येत आहे. ॲल्युमिनियमचे वायदे दर ५.६० रुपयांनी म्हणजेच १.६९ टक्क्यांनी घसरून ३२५.२० रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर लाल निशाणावर व्यवहार करत आहेत.

कमोडिटी बाजारातील जाणकारांच्या मते, भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चितता कायम असल्यामुळे सोने आणि चांदीच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला सातत्याने आधार मिळत आहे. भारतात आगामी लग्नसराईच्या हंगामामुळेही देशांतर्गत सराफा बाजारात मौल्यवान धातूंची मागणी मजबूत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा विस्कळीत होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतींना घसरणीच्या पातळीवर आधार मिळत आहे. तर चीनमधील औद्योगिक मागणी मंदावल्यामुळे ॲल्युमिनियमसारख्या धातूंवर दबाव कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande