
कीव, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।रशियाच्या युद्धात टिकून राहण्यासाठी लाखो युक्रेनियन नागरिकांची लढाई आता त्यांच्या स्वतःच्या घरात, अंधार आणि कडाक्याच्या थंडीमध्ये सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे कीवमधील वीजपुरवठा अत्यंत बिकट अवस्थेत पोहोचला आहे. त्यामुळे पुढील वीजकपात होण्यापूर्वी स्वयंपाक करणे, मुलांचा गृहपाठ पूर्ण करून घेणे आणि मोबाईल फोन चार्ज करणे, यासाठी कुटुंबांची धावपळ सुरू असते.
कीवमधील काही घरांमध्ये तब्बल २० तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर काही भागांमध्ये दिवसातून केवळ चार ते पाच तासच वीज उपलब्ध होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हीटिंग व्यवस्था, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यातच तापमानात घट होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे संकट केवळ घरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. कीव हा सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक आहे. वीजटंचाईमुळे येथील मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून, अनेकदा ट्रॉलीबस सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण युक्रेनमधील लाखो नागरिकांना वीजपुरवठ्याविना राहावे लागत आहे. रशियाकडून ऊर्जा सुविधांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
वीजकपातीचे हे संकट गेल्या हिवाळ्याच्या तुलनेत यंदा लवकर सुरू झाले असून, ते अधिक काळ टिकत आहे. त्यामुळे तापमान आणखी घसरल्यास देशातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणे शक्य होईल का, याबाबत चिंता वाढली आहे.युक्रेनमधील अधिकाऱ्यांना चिंता आहे की, दिवसभरात किमान चार तासही वीजपुरवठा करता आला नाही, तर लाखो नागरिकांसाठी दैनंदिन जीवन जगणे अत्यंत कठीण होईल. कीवमधील काही कुटुंबांना आधीच तब्बल २० तासांच्या वीजकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनिश्चित वीजपुरवठ्याशी जुळवून घेण्यासाठी नागरिकांना आपली संपूर्ण दिनचर्या बदलावी लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode