यूएईमध्ये ट्रकची अनेक वाहनांची धडक, अनेकांचा मृत्यू
अबुधाबी , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) शेख खलिफा बिन झायेद रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. येथे एका ट्रकची अनेक वाहनांना धडक बसल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. हा अपघात यूएईमधील फुजैराह अमिरातीज
यूएईमध्ये ट्रकची अनेक वाहनांची धडक, अनेकांचा मृत्यू


अबुधाबी , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) शेख खलिफा बिन झायेद रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. येथे एका ट्रकची अनेक वाहनांना धडक बसल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. हा अपघात यूएईमधील फुजैराह अमिरातीजवळ घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि नागरी संरक्षण विभागाची विशेष पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातस्थळ सुरक्षित करणे आणि वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी पथकांनी आवश्यक उपाययोजना केल्या. वृत्तानुसार, फुजैराह पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

अपघातानंतर फुजैराह पोलिसांनी नागरिकांना या घटनेबाबत कोणत्याही अफवा किंवा अपुष्ट माहितीचा प्रसार न करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मृतांची आणि जखमींची संख्या तसेच त्यांच्या राष्ट्रीयत्वाबाबत कोणतेही अप्रमाणित दावे करू नयेत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अपघातासंदर्भातील माहिती केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांकडूनच घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

फुजैराह पोलीस मुख्यालयाने पुढे सांगितले की, अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे. सर्व माहितीची पडताळणी करून अधिकृत दुजोरा मिळाल्यानंतरच यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल. वृत्तानुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति पोलिसांनी तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.

दरम्यान, फुजैराह पोलिसांनी रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे आणि वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असेही पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande