
लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। काही माणसांच्या मनात कलेची ज्योत एकदा पेटली की काळाचे कितीही अंतर पडले तरी ती कधीच विझत नाही. याचाच प्रत्यय शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सुपुत्र दत्ता जवळगे यांच्या रूपाने पुन्हा एकदा येत आहे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ते मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत असून, त्यांच्या या नव्या नाट्यप्रवेशाने अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ मध्ये दत्ता जवळगे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेले 'तू माझ्या नशिबाचा तारा' हे नाटक मुंबईत सादर होणार आहे. सांस्कृतिक कलादर्पण, मुंबई प्रस्तुत या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले असून, संगीत अभिलेश सरपडवळ यांचे आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांचे पार्श्वगायन या नाटकाला लाभले आहे.
दत्ता जवळगे यांचा यापूर्वीचा नाट्यप्रवासही उल्लेखनीय राहिला आहे. १९९३ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे रसिकराज प्रोडक्शन प्रस्तुत 'हसलीस का' या सुपरहिट मराठी नाटकात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. एन. रेळेकर लिखित आणि अशोक झगडे दिग्दर्शित या नाटकातून त्यांनी रसिकांची दाद मिळवली होती. त्यानंतर तब्बल तीन दशकांहून अधिक काळाने ते पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होत आहेत.
या नाटकात प्रकाश राणे, रेखा पवार, विकास मोजर, पद्माकर गांधी, स्कंदा गांधी, लावण्या बामणे, मक्सुद अहमद, रश्मी पालकर, निखिल मालुसरे, साक्षी केळकर, आद्विका आडीवरे, मोक्ष पवार, भावना पवार यांच्यासह दत्ता जवळगे विविध महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे दत्ता जवळगे यांचे हे पुनरागमन केवळ एका कलाकाराचे रंगभूमीवरील पुनरागमन नसून, आपल्या मातीशी आणि कलेशी असलेली नाळ जपणाऱ्या भूमिपुत्राच्या जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आहे.
१७ नोव्हेंबरला मुंबईत नाट्यप्रयोग!
मुंबईतील गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता 'तू माझ्या नशिबाचा तारा' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर उभे राहणाऱ्या शिरूर ताजबंदच्या या कलावंताच्या अभिनयाची झलक अनुभवण्यासाठी नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता आहे.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण कलेची ओढ कायम राहिली! दत्ता जवळगे यांच्या या पुनरागमनाने शिरूर ताजबंदच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis