
जळगाव, 12 नोव्हेंबर (हिं.स.) । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर घसरण लागली आहे. दिवाळीनंतर जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल पाच हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने अनेक ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता दर कमी झाल्याने सराफ बाजारात ग्राहकांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात एकूण ३ हजार ८०० रुपयांची घसरण झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारातील उपलब्ध दरांनुसार, आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४३ हजार १७० रुपयांवर आला आहे. तर जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव १ लाख ९० हजार ५५० रुपये झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. मात्र, दागिने खरेदी करताना घडणावळ आणि इतर शुल्कांमुळे अंतिम किंमत बदलू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर