जागरूकता असूनही २८ टक्के ग्राहकांचा जीवन विम्याला नकार; विश्वास जिंकण्यासाठी नवी मोहीम
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : जीवन विम्याबाबत जागरूकता असूनही अनेक ग्राहक विमा पॉलिसी घेण्यास उत्सुक नसतात. विमा कंपन्या दाव्यांची रक्कम प्रत्यक्षात देतात का, टर्म इन्शुरन्समधून परतावा मिळत नाही, तसेच दीर्घकालीन बचत योजनांमधून उत्पन्नाची हमी काय,
सबसे पहले लाइफ इन्शुरन्स


मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : जीवन विम्याबाबत जागरूकता असूनही अनेक ग्राहक विमा पॉलिसी घेण्यास उत्सुक नसतात. विमा कंपन्या दाव्यांची रक्कम प्रत्यक्षात देतात का, टर्म इन्शुरन्समधून परतावा मिळत नाही, तसेच दीर्घकालीन बचत योजनांमधून उत्पन्नाची हमी काय, अशा अनेक शंकांमुळे ग्राहक विम्यापासून दूर राहतात. या ग्राहकांच्या मनातील साशंकता दूर करून त्यांना जीवन विम्याकडे वळविण्यासाठी विमा जागरूकता समितीने (IAC-Life) ‘सबसे पहले लाइफ इन्शुरन्स’ मोहिमेचा पुढील टप्पा जाहीर केला आहे.

या मोहिमेचा मुख्य भर जीवन विम्याबाबत माहिती नसलेल्या ग्राहकांपेक्षा माहिती असूनही विमा घेण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांवर असेल. मोहिमेच्या अभ्यासानुसार, अशा ग्राहकांचे प्रमाण देशातील एकूण ग्राहकांमध्ये २८ टक्के आहे. या ग्राहकांच्या मनातील गैरसमज आणि शंका दूर करण्यासाठी दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांनी या चित्रफितींचे दिग्दर्शन केले आहे.

हिंदी भाषेतील मोहिमेत विक्रांत मेस्सी आणि श्वेता त्रिपाठी सहभागी झाले आहेत. दक्षिण भारतीय बाजारपेठांसाठी कालिदास जयराम आणि ऐश्वर्या राजेश यांची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांमधील स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून जीवन विम्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यापूर्वीच्या मोहिमेत जीवन विम्याची सर्वसाधारण जागरूकता वाढविण्यावर भर देण्यात आला होता. भावनिक कथाकथनाच्या माध्यमातून कुटुंबाची स्वप्ने आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी जीवन विम्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले होते. या मोहिमेच्या परिणामांचे जुलै २०२६ मध्ये कांतर संस्थेने मूल्यमापन केले. त्यानुसार, ग्राहकांच्या मनात सर्वप्रथम येणारी जीवन विम्याची आठवण (Top-of-mind awareness) ५७ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढली. उत्स्फूर्त जागरूकता ८५ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर पोहोचली. तर विमा खरेदी करण्याची इच्छाही ४९ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांपर्यंत वाढली.

या पार्श्वभूमीवर आता केवळ जागरूकता वाढविण्याऐवजी ग्राहकांना प्रत्यक्ष विमा खरेदीचा विचार करण्यास प्रवृत्त करण्यावर भर दिला जाणार आहे. मोहिमेच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या दाव्यांच्या पूर्ततेबाबतचा विश्वास, टर्म इन्शुरन्समधील परताव्याबाबतच्या अपेक्षा आणि दीर्घकालीन बचत योजनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतच्या शंका यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जाईल.

या मोहिमेत ग्रामीण भागावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण बाजारपेठांसाठीच्या माध्यम खर्चातील वाटा गेल्या वर्षीच्या २३ टक्क्यांवरून यंदा ३० टक्के करण्यात आला आहे. दूरचित्रवाणी, कनेक्टेड टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडिया, ओटीटी, बाह्य जाहिराती, चित्रपटगृहे आणि रिटेल मीडिया अशा विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे.

हिंदीसह बंगाली, पंजाबी, गुजराती, कन्नड, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी, ओडिया आणि आसामी या प्रादेशिक भाषांमध्येही ही मोहीम राबविली जाणार आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसाठी ४२५ शहरांमध्ये डिजिटल वॉल पेंटिंग आणि अन्य बाह्य जाहिरात उपक्रम राबविण्यात येतील. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातूनही ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस सुरू झालेली ही मोहीम दोन टप्प्यांत एकूण १८ आठवडे राबविली जाणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबरअखेर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत असेल. त्यानंतर जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत दुसरा टप्पा राबविण्यात येईल.

विमा जागरूकता समितीचे अध्यक्ष कमलेश राव म्हणाले, जीवन विम्याबाबत जागरूकता निर्माण करणे ही पहिली पायरी आहे. मात्र, ग्राहकांना विमा घेण्यापासून रोखणाऱ्या शंका आणि चिंता समजून घेऊन त्यांचे निराकरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नव्या मोहिमेतून विम्याबाबत साशंक असलेल्या ग्राहकांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन कुटुंबाच्या आर्थिक भविष्याच्या सुरक्षिततेबाबत त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

‘इन्शुरन्स फॉर ऑल बाय २०४७’ या व्यापक उद्दिष्टाच्या अनुषंगाने अधिकाधिक भारतीयांना जीवन विम्याचे महत्त्व पटवून देणे आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी त्याचा विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande