आसाम : भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू !
काजीरंगा येथी टेम्पो ट्रॅव्हलर आणि कंटेनरची टक्कर गुवाहाटी, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : आसाममधील प्रसिद्ध काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी भीषण रस्ते अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार धडक ह
काझीरंगा येथील अपघाताचे छायाचित्र


काजीरंगा येथी टेम्पो ट्रॅव्हलर आणि कंटेनरची टक्कर

गुवाहाटी, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : आसाममधील प्रसिद्ध काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी भीषण रस्ते अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार धडक होऊन झालेल्या या दुर्घटनेत तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण धडकेमुळे प्रवासी वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर जोरहाट येथून गुवाहाटीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी त्याची समोरासमोर धडक झाली. गोलाघाट जिल्ह्यातील कोहोरा परिसरातील हाथीकुली चहामळ्याजवळील रंगाजन येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वर हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की वाहनातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काही जण वाहनात अडकले होते.अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयासह अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. घटनास्थळी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या कारणांबाबत पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे आणि त्यामुळे समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडक बसली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या दुर्घटनेत सहभागी असलेल्या ट्रॅव्हलर वाहनाच्या वाहतूक नियमभंगाची माहितीही समोर आली आहे. संबंधित वाहनावर यापूर्वी 12 वाहतूक चलने जारी करण्यात आली होती. त्यापोटी 38 हजार 500 रुपयांचा दंड भरल्याची माहिती असून आणखी चार हजार रुपयांचे एक चलन प्रलंबित असल्याचे वृत्त आहे. मात्र, या वाहतूक चलनांचा सदर अपघाताशी थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.आसाम सरकारमधील पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री अतुल बोरा यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वारे त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. जखमींना तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande