चला, मराठी शिकण्याचा प्रवास पुन्हा सुरू करूया!
आपण मराठी बोलतो, वाचतो आणि लिहितो; मात्र मराठी भाषा खऱ्या अर्थाने किती समजून घेतो, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. शब्दांचे अचूक लेखन, योग्य वाक्यरचना, व्याकरणातील बारकावे आणि साहित्याचा भावार्थ समजून घेणे या गोष्टी केवळ भाषेच्या वापरासा
चला, मराठी शिकण्याचा प्रवास पुन्हा सुरू करूया!


आपण मराठी बोलतो, वाचतो आणि लिहितो; मात्र मराठी भाषा खऱ्या अर्थाने किती समजून घेतो, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. शब्दांचे अचूक लेखन, योग्य वाक्यरचना, व्याकरणातील बारकावे आणि साहित्याचा भावार्थ समजून घेणे या गोष्टी केवळ भाषेच्या वापरासाठी नव्हे, तर प्रभावी संवादासाठीही महत्त्वाच्या आहेत. याच विचारातून मराठी भाषेचा अभ्यास नव्याने करण्याचा एक प्रयत्न सुरू केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवण्याचे काम करत आलो आहे. पर्यावरण, पाणी, कचरा, प्लास्टिक, जैवविविधता आणि सामाजिक जबाबदारी अशा विषयांवर वृत्तपत्रांमधून सातत्याने लेखन केले. या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, एखादा विचार कितीही महत्त्वाचा असला, तरी तो योग्य शब्दांत आणि सहज समजेल अशा भाषेत मांडता आला तरच त्याचा प्रभाव निर्माण होतो.

लेखन करताना अनेकदा शब्दांची निवड, वाक्यरचना आणि अर्थाची स्पष्टता याबाबत सुधारणा करण्याची गरज जाणवली. स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याच्या याच प्रक्रियेतून मराठी भाषेचा क्रमबद्ध अभ्यास करण्याची कल्पना पुढे आली.

अक्षरांपासून साहित्यापर्यंतचा अभ्यास

या अध्ययन साहित्याची सुरुवात अगदी मूलभूत घटकांपासून करण्यात आली आहे. स्वर, व्यंजने, बाराखडी, मात्रा, जोडाक्षरे, शब्दरचना, वाक्यरचना, व्याकरण, शब्दांचे अर्थ आणि साहित्याचे आकलन अशा विविध टप्प्यांचा यात समावेश आहे.

केवळ नियम आणि व्याख्या सांगण्यापेक्षा एखादी गोष्ट कशी समजून घ्यावी, तिच्यामागील कारण काय आहे आणि तिचा दैनंदिन व्यवहारात उपयोग कसा करावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रश्न विचारणे, चुका ओळखणे आणि त्या सुधारण्याची प्रक्रिया समजून घेणे, हा या अध्ययन मालिकेचा मुख्य उद्देश आहे.

ही मालिका केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून शिक्षक, पालक, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार आणि पुन्हा नव्याने मराठी लेखन शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरावी, अशी अपेक्षा आहे.आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शुद्धलेखन तपासणे, वाक्यरचना सुधारणे आणि शब्दांचे अर्थ समजून घेणे सोपे झाले आहे. मात्र, तंत्रज्ञानाने चूक दुरुस्त करण्याबरोबरच ती चूक का झाली, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या अध्ययन प्रवासात सहाय्यक म्हणून करण्याचा विचार आहे.

या अध्ययन साहित्याच्या निर्मितीमध्ये मनोज सुमन शिवाजी सानप यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. त्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

तुमच्या सहभागातून अधिक समृद्ध होणार अध्ययन साहित्य

या पुस्तक मालिकेतील प्रत्येक विभाग आणि प्रकरण स्वतंत्र पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची वाट न पाहता आवडीच्या विषयापासून अभ्यास सुरू करता येईल.

ज्यांना या मालिकेतील कोणतेही प्रकरण हवे असेल त्यांनी नाव आणि आवश्यक प्रकरणाचे नाव नमूद करून WhatsApp वर संदेश पाठवावा. 7977513822 या नव्या प्रवासात वाचकांनी केवळ कौतुक न करता चुका, त्रुटी आणि सुधारणा याबाबत प्रामाणिक अभिप्राय द्यावा, ही अपेक्षा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, पालकांनी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांच्या माध्यमातून या साहित्याचे मूल्यमापन करावे.

माझ्यासाठी हा केवळ पुस्तकनिर्मितीचा उपक्रम नसून स्वतः शिकताना आलेले अनुभव, प्रश्न आणि मिळालेली उत्तरे इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.चला, पुन्हा एकदा अक्षरांपासून सुरुवात करूया! अक्षरांची ओळख झाली की शब्द समजू लागतात, शब्द समजले की विचार व्यक्त होतात आणि विचार व्यक्त झाले की साहित्याचे नवे विश्व खुले होते.

– विजयकुमार कट्टी

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande