संपूर्ण आठवडाभर कमोडिटी बाजारात चढ-उतार; सोने, चांदीसह औद्योगिक धातूंच्या दरातही घसरण
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत कमोडिटी बाजारात (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज – एमसीएक्स) या आठवड्यात मोठ्या चढ-उतारांसह व्यवहार झाले. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर प्रत्यक्ष बाजारातील मागणीत आलेली मंदी आणि अमेरिकन डॉलर निर्देशांकातील मजबुती
Weekly Commodity Market Review


नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत कमोडिटी बाजारात (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज – एमसीएक्स) या आठवड्यात मोठ्या चढ-उतारांसह व्यवहार झाले. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर प्रत्यक्ष बाजारातील मागणीत आलेली मंदी आणि अमेरिकन डॉलर निर्देशांकातील मजबुती यामुळे मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव निर्माण झाला. संपूर्ण आठवड्याच्या व्यवहारात सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे दर त्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली घसरून बंद झाले. दुसरीकडे, ऊर्जा बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जोरदार सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. औद्योगिक धातूंच्या म्हणजेच बेस मेटलच्या बाजारातही या आठवड्यात सातत्याने दबाव कायम राहिला.

वायदे बाजारातील सोने आणि चांदीच्या व्यवहारांचा विचार करता, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबरमध्ये होणाऱ्या वितरणासाठी असलेले सोने आठवड्याच्या अखेरीस प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ८२० रुपयांच्या आसपास बंद झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे २ हजार ६०० रुपयांची साप्ताहिक घसरण नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे चांदीची चमकही या आठवड्यात फिकी पडली आणि चांदीचा भाव २ लाख रुपयांच्या मानसिक पातळीखाली घसरला. आठवड्याच्या अखेरीस एमसीएक्सवर चांदीचा वायदे भाव प्रति किलो १ लाख ७९ हजार ५६० रुपयांवर बंद झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत ही मोठी घसरण दर्शवणारी स्थिती आहे.

ऊर्जा बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी या आठवड्यात नीचांकी पातळीवरून जोरदार पुनरागमन केले. आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे ब्रेंट क्रूडचा भाव घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ पोहोचला होता. मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात सौदी अरेबियातील तेल सुविधांवर झालेले हल्ले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव वाढून प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पुढे गेला. तर देशांतर्गत बाजारात म्हणजेच एमसीएक्सवर कच्च्या तेलाचा भाव वाढीसह प्रति बॅरल ८ हजार ३७२ रुपयांवर बंद झाला.

औद्योगिक धातू म्हणजेच बेस मेटल विभागात या आठवड्यात मंदी आणि दबावाचे वातावरण कायम राहिले. चीनमधील उत्पादन क्षेत्रातील कामकाजाचा वेग मंदावल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात औद्योगिक धातूंची मागणी कमकुवत राहिली. साप्ताहिक आधारावर एमसीएक्सवर ॲल्युमिनियमचे दर दबावाखाली राहून प्रति किलो ३२८ रुपये ९० पैशांच्या आसपास बंद झाले. त्याचप्रमाणे तांब्याच्या दरांमध्येही उच्च पातळीवर नफावसुलीचा दबाव दिसून आला. त्यामुळे तांब्याचा भाव प्रति किलो १ हजार ३३० ते १ हजार ३५२ रुपयांच्या मर्यादित कक्षेत राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande