

रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्हा आट्यापाट्या संघटना आणि श्रीवर्धन तालुका आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्ली पंचतन येथील क्रीडा संकुलात आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट आट्यापाट्या अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील मुलांचे २६ आणि मुलींचे २२ असे एकूण ४८ संघ सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यांत मुलांच्या गटात जळगाव संघाने विजेतेपद पटकावले. धाराशिव द्वितीय, रायगड तृतीय तर वाशिम संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. जळगावने सलग सहाव्यांदा विजेतेपद मिळवण्याची कामगिरी केली. मुलींच्या गटात अमरावती संघाने विजेतेपद मिळवत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपदाची हॅटट्रिक साधली. धाराशिव द्वितीय, जळगाव तृतीय आणि परभणी संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला.
मुलांच्या गटात जळगावच्या साहिल बिडकर याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. धाराशिवच्या शिवम डोंगरे आणि रायगडच्या नील सातामकर यांची उत्कृष्ट बचावपटू म्हणून निवड झाली. मुलींच्या गटात अमरावतीच्या खुशी कडू हिला सर्वोत्तम खेळाडू, तर धाराशिवच्या कल्याणी घुले आणि रायगडच्या सान्वी गायकर यांना उत्कृष्ट बचावपटू पुरस्काराने गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून क्रीडा क्षेत्रासाठी एकत्रित सहकार्य केले. उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी, मंदार तोडणकर आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाला माजी राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यभरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वपक्षीय सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली. पारंपरिक आट्यापाट्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)