
कॅलिफोर्निया (अमेरिका), 16 नोव्हेंबर (हिं.स.) १९ वर्षीय मिरा आंद्रेव्हाने कॅलिफोर्निया येथे झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम सामन्यात एलिना स्वितोलिनाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सध्याची फ्रेंच ओपन चॅम्पियन असलेल्या आंद्रेव्हाने ३२ वर्षीय स्वितोलिनाचा ७-५, ६-३ असा पराभव केला. हा सामना १ तास ४८ मिनिटे चालला. या विजयामुळे, २००४ मध्ये मारिया शारापोव्हाने मिळवलेल्या जेतेपदानंतर, डब्ल्यूटीए फायनल्स जिंकणारी आंद्रेव्हा सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे.
स्वितोलिनाने आंद्रेव्हाला दोन्ही सेटमध्ये कडवी झुंज दिली. पहिल्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी साधून स्वितोलिनाने या आठवड्यात आंद्रेव्हाविरुद्ध इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत सर्वाधिक संघर्ष केला होता. मात्र, आंद्रेव्हाने लगेच पुनरागमन करत स्वितोलिनाची सर्व्हिस तोडली आणि सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये, ३२ वर्षीय स्वितोलिनाने चार 'ब्रेक पॉइंट्स' वाचवले; हा गेम सहा वेळा 'ड्यूस'पर्यंत गेला आणि तो पूर्ण होण्यासाठी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. स्वितोलिना ४-३ अशी आघाडीवर होती, परंतु आंद्रेव्हाने स्वतःची सर्व्हिस राखली आणि सहाव्यांदा स्वितोलिनाची सर्व्हिस तोडत सामना जिंकला.
अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच आंद्रेव्हा स्वतःशीच संवाद साधत होती. तिने स्वतःला कोणतीही चूक न करण्याची सूचना दिली होती. वॉर्म-अप दरम्यान जर एखादा चेंडू चुकला, तर ती स्वतःला सांगायची की, पुढच्या चेंडूवर ती याची भरपाई करून घेईल.
आंद्रेव्हा म्हणाली, मला जाणवले की, तणावावर नियंत्रण मिळवणे सोपे जात आहे. मग विचार केला, का न याच मानसिकतेसह संपूर्ण सामना खेळावा? तिने नमूद केले की, तिच्या टीमने तिला वर्तमानात राहण्यास मदत केली आणि तिला तिच्या क्षमतेच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित केले.
ट्रॉफी वितरण समारंभात बोलताना आंद्रेव्हा म्हणाली, ज्या टेनिसपटूंनी येथे विजेतेपद मिळवले आहे, त्या गटाचा भाग होणे खूपच अद्भुत वाटते. जेव्हा मला काहीही करण्याची इच्छा नसते, तेव्हा मला माझ्या क्षमतेच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या टीमची मी अत्यंत आभारी आहे. माझ्यासाठी संघर्ष केल्याबद्दल आणि मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद, असे ती म्हणाली.
१९ वर्षीय टेनिसपटूने या स्पर्धेतील आपली सर्वात कठीण प्रतिस्पर्धी ठरलेल्या स्वितोलिनाचेही अभिनंदन केले. ती म्हणाली, एलिना आणि तुझ्या टीमचे या शानदार आठवड्याबद्दल अभिनंदन. तुमचा हा हंगाम अतिशय उत्तम राहिला आहे, आणि मला माहीत आहे की अंतिम सामन्यात पराभूत होणे कठीण असते. तुला एक लहान मुलगी आहे. तू एक उत्तम आई आहेस; पुन्हा मैदानात परत येऊन तू जी कामगिरी केलीस, ती कौतुकास्पद आहे. पुढील हंगामासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
शेवटी, मी स्वतःचेही आभार मानू इच्छिते. नेहमी कठोर परिश्रम केल्याबद्दल, कधीही हार न मानल्याबद्दल, सुट्टी न घेता सातत्याने प्रयत्न करत राहिल्याबद्दल आणि आपल्या ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित राहिल्याबद्दल मी स्वतःचे आभार मानते, असे म्हणत तिने आपले बोलणे पूर्ण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे