

प्रति समभाग १२९ ते १३६ रुपये मूल्यपट्टा निश्चित
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) उपकंपनी असलेल्या ओडिशातील महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडचा (एमसीएल) प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) १९ नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना २३ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. यासाठी प्रति समभाग १२९ ते १३६ रुपये असा मूल्यपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, महानदी कोलफिल्ड्सचा आयपीओ १९ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि २३ नोव्हेंबर रोजी बंद होईल. यासाठी प्रति समभाग १२९ ते १३६ रुपये असा मूल्यपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ८,९८१ कोटी रुपये उभारायचे आहेत.
महानदी कोलफिल्ड्सच्या माहितीनुसार, हा आयपीओ पूर्णपणे विद्यमान समभाग विक्री प्रस्तावावर (ओएफएस) आधारित आहे. याअंतर्गत प्रवर्तक कंपनी कोल इंडिया लिमिटेड ६६.१८ कोटी समभागांची विक्री करून आपला १० टक्के हिस्सा कमी करणार आहे. कंपनीने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, या आयपीओमध्ये कोल इंडिया आपल्या हिस्सेदारीतील काही समभागांची विक्री करणार आहे. कंपनीचे समभाग २७ नोव्हेंबर रोजी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथे सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय म्हणजे, देशातील एकूण कोळसा उत्पादनात कोल इंडिया लिमिटेडचा ८० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. सध्या महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये कोल इंडिया लिमिटेडची १०० टक्के हिस्सेदारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule