नागपुरात १३ वर्षांनंतर पुन्हा ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार !
आगामी २० ते २४ जानेवारीदरम्यान कुस्तीचा महासंग्राम नागपूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा तब्बल १३ वर्षांच
कुस्ती लोगो


आगामी २० ते २४ जानेवारीदरम्यान कुस्तीचा महासंग्राम

नागपूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा नागपूरच्या मातीत रंगणार आहे. येत्या २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभरातील नामांकित मल्लांच्या दमदार डावपेचांनी नागपूरचा आखाडा गाजणार असून, सुमारे १३०० कुस्तीपटूंच्या सहभागामुळे शहरात कुस्तीचा महासंग्राम अनुभवायला मिळणार आहे. लकडगंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल (कच्छी विसा) मैदानावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस आणि मनपाचे सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर उपस्थित होते.

४२ संघ, १३०० मल्ल अन् 5 दिवस कुस्तीचा थरार!

या स्पर्धेत राज्यातील तब्बल ४२ शहर व जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघातून गादीवरील कुस्तीसाठी १० आणि मातीवरील कुस्तीसाठी १० अशा एकूण २० मल्लांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विविध वजनगटांत सुमारे १३०० कुस्तीपटू आपले कौशल्य, ताकद आणि डावपेच पणाला लावणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे नागपूरमध्ये कुस्तीचा मोठा क्रीडा महोत्सवच अवतरणार आहे.

मातीचा सुगंध अन् आधुनिक मॅटवरील कुस्तीचा रोमांच!

यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक मातीतील कुस्ती आणि आधुनिक मॅटवरील कुस्ती असा दुहेरी थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र आखाडे उभारण्यात येणार आहेत. अनुभवी मल्लांसोबतच नवोदित कुस्तीपटूंनाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विविध वजनगटांतील चुरशीच्या लढतींनंतर अंतिम सामन्यात महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोण पटकावणार, याची उत्सुकता आतापासूनच कुस्तीप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

१७०० जणांचा सहभाग; नियोजनासाठी मोठी यंत्रणा सज्ज

स्पर्धेच्या नियोजनासाठी व्यापक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी संघासोबत दोन प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असे एकूण १२६ प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेच्या संचालकपदाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ तांत्रिक अधिकारी आणि २५ पदाधिकारी स्पर्धेचे कामकाज सांभाळणार आहेत. मल्ल, प्रशिक्षक, व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी आणि पदाधिकारी मिळून सुमारे १७०० जणांचा सहभाग या स्पर्धेत अपेक्षित आहे.

संदीप जोशींच्या प्रस्तावाला मंजुरी

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद नागपूरला मिळावे, यासाठी नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे प्रस्ताव मांडला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नागपुरात स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. नागपूर महानगरपालिकेच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत हा क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा आणि अभिमानास्पद उपक्रम ठरणार आहे.

एकूणच, तब्बल १३ वर्षांनंतर नागपूरला लाभलेले ‘महाराष्ट्र केसरी’चे यजमानपद शहराच्या क्रीडा वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

-----------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande