ठाणे जिल्ह्यात रंगणार मिनी ऑलम्पिक; ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
ठाणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या ''सांसद खेल महोत्सव''अंतर्गत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ
ठाणे जिल्ह्यात रंगणार मिनी ऑलम्पिक; ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग


ठाणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या 'सांसद खेल महोत्सव'अंतर्गत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून यंदा 'खासदार क्रीडासंग्राम सीझन २'चे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये हा भव्य क्रीडामहोत्सव रंगणार असून, यामध्ये ७५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकार आणि ३२ हुन अधिक अधिक क्रीडास्थळांवर आयोजित होणारा हा क्रीडामहोत्सव म्हणजे ठाणे जिल्ह्याचे एक प्रकारचे 'मिनी ऑलिम्पिक' ठरणार आहे. युवा पिढीला क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना कशा पद्धतीने भविष्यात अधिक संधी देता येईल याबाबत देखील काम करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे खासदार क्रीडा संग्राम उपक्रमाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅडमिंटन असोसिएशनचे श्रीकांत वाड यांच्यासह विविध खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित होते. डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. तर देशाचे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या मुख्य उपस्थितीत उपक्रमाची सांगता होणार आहे. तसेच यावेळी खेळाडूंना मार्गदर्शनासाठी आणि भेटीसाठी विविध क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सांसद खेल महोत्सव'च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी व्यापक उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. याच संकल्पनेला अनुसरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार क्रीडासंग्रामची सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा या उपक्रमाची व्याप्ती अधिक मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. यंदा केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे तसेच तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी आणि विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार हेमंत पाटील, राजेश मोरे, बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, उपनेते राहुल शेवाळे, प्रवक्त्या शितल म्हात्रे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उल्हानसनगर महापालिका महापौर अश्विनी निकम, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

३१ खेळांचा समावेश; पारंपरिक आणि आधुनिक क्रीडाप्रकारांचा अनोखा संगम

यंदाच्या खासदार क्रीडासंग्रामचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय खेळांचा वारसा जपतानाच आधुनिक आणि नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या खेळांनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आजच्या Gen Z आणि युवा पिढीच्या आवडीचे खेळ तसेच आपल्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीतील खेळ यांचा सुंदर मिलाफ या क्रीडासंग्राममध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाला स्वतंत्र व्यासपीठ देण्यासोबतच विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. लोकप्रिय खेळांपुरते मर्यादित न राहता तुलनेने कमी प्रसिद्धी मिळणाऱ्या खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

३२ क्रीडास्थळांवर होणार स्पर्धा

या भव्य क्रीडामहोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वतंत्र विभागीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई, दिवा, कळवा, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच ठाणे शहरातील विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे ३२ हून अधिक क्रीडास्थळांवर विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे खेळाडूंना आपल्या परिसरातच स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रवासाचे अंतर आणि इतर अडचणींमुळे अनेकदा स्पर्धांपासून दूर राहणाऱ्या स्थानिक खेळाडूंनाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande