
रत्नागिरी, 18 नोव्हेंबर (हिं.स.) । महाराष्ट्रातील सर्वाधिक पारितोषिकांची रक्कम असलेल्या आणि चित्रपट व नाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा पाठिंबा लाभलेल्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रप्रमुखपदी प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे.
डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये विभागप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी केंद्रावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय, न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे तेरावे वर्ष आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून २० डिसेंबरपर्यंत पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होत आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिका सादर केल्या जात आहेत.
अंतिम फेरीतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचे ५० हजार रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय अन्य अनेक पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरू होईल. या फेरीतील प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेसाठी ७ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या एकांकिकेसाठी ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पारितोषिकांची रक्कम अंतिम फेरीत संबंधित एकांकिका सादर झाल्यानंतरच प्रदान करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून प्राथमिक फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डॉ. आनंद आंबेकर यांच्याशी ७०२०७३७४०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी