चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; भाजप जिल्हाध्यक्षांच्या प्रयत्नांना यश
रत्नागिरी, 18 नोव्हेंबर (हिं.स.) । चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी समाधान व्यक्त केले आ
प्रशांत यादव


रत्नागिरी, 18 नोव्हेंबर (हिं.स.) । चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी समाधान व्यक्त केले आहे.

चिपळूण तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. यादव यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन देत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतही हा विषय प्रभावीपणे पोहोचविण्यात आला होता. यानंतर महसूलमंत्र्यांनी वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतीसमोरील आव्हाने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाने चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यास मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.

दुष्काळग्रस्त यादीतील समावेशामुळे शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा निश्चितच आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande