
* अमेरिकेच्या वेबकोडजिनीकडून 20 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : शेती तंत्रज्ञान, खाणकाम आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या बीएसई-सूचीबद्ध एससी ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या डिजिटल कृषी प्लॅटफॉर्म 'ॲग्रीब्रिज'च्या जागतिक विस्तारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये धोरणात्मक गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी कंपनीला अमेरिकेतील 'वेबकोडजिनी' कंपनीकडून 60 कोटी रुपयांच्या एकत्रित प्रकल्पाचा प्राथमिक प्रस्ताव प्राप्त झाला आहे. यासोबतच कंपनीने भागधारकांसाठी 10:1 स्टॉक स्प्लिट आणि 4:5 बोनस शेअर्सचा प्रस्तावही मांडला आहे.
कसा असेल हा 60 कोटींचा करार?
17 नोव्हेंबर 2026 रोजी प्राप्त झालेल्या या प्रस्तावानुसार, अमेरिकन कंपनी 'वेबकोडजिनी' स्वतंत्र 'ॲग्रीब्रिज' कंपनी किंवा संयुक्त उपक्रमात 25 टक्के हिस्सेदारीसाठी 20 कोटी रुपयांची प्राथमिक इक्विटी गुंतवणूक करणार आहे. उर्वरित 75 टक्के मालकी हक्क एससी ॲग्रोटेककडेच राहतील. या प्रस्तावात कंपनीचे प्री-मनी मूल्य 60 कोटी रुपये आणि पोस्ट-मनी मूल्य 80 कोटी रुपये धरण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, वेबकोडजिनीने पुढील 48 महिन्यांत जागतिक विस्तारासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. यामध्ये प्रॉडक्ट इंजिनिअरिंग आणि एआयसाठी 12 कोटी, अमेरिका व कॅनडा बाजारपेठेसाठी 10 कोटी, आफ्रिकेसाठी 8 कोटी, दक्षिण अमेरिकेसाठी 6 कोटी आणि पायाभूत सुविधांसाठी 4 कोटी रुपयांचा समावेश आहे. या करारांतर्गत अमेरिका, कॅनडा, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत 10 वर्षांसाठी 'ॲग्रीब्रिज'च्या विशेष व्यावसायिक हक्कांसह निव्वळ महसुलावर 20 टक्के वितरण शुल्क प्रस्तावित आहे.
नफ्यात 48 पटीने विक्रमी वाढ आणि बोनसची भेट
एससी ॲग्रोटेकची आर्थिक कामगिरीही अत्यंत दमदार राहिली आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या 5.02 कोटी रुपयांवरून थेट 45.26 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर, निव्वळ नफ्यात तब्बल 48 पटीने वाढ होऊन तो 0.21 कोटी रुपयांवरून 10.21 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने 4 नोव्हेंबर 2026 रोजी 'ॲग्रीब्रिज' हे व्यासपीठ लाँच केले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी कंपनीने 10:1 स्टॉक स्प्लिट, 4:5 बोनस शेअर्स आणि अधिकृत भागभांडवलात 61 कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव भागधारकांसमोर ठेवण्याचे निश्चित केले आहे.
20 नोव्हेंबरला संचालक मंडळाची बैठक
या प्रस्तावाचे मूल्यांकन करण्यासाठी एससी ॲग्रोटेकच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक 20 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. यामध्ये गुंतवणुकीची रचना, कंपनीचे मूल्यांकन, बौद्धिक संपदा हक्क आणि कायदेशीर बाबींची सखोल तपासणी केली जाईल.
शेतकरी, पुरवठादार आणि संस्थात्मक खरेदीदारांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्यासाठी 'ॲग्रीब्रिज'ची सुरुवात करण्यात आली आहे. वेबकोडजिनीसोबतच्या प्रस्तावित सहकार्यामुळे आमची तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल आणि भारताबाहेरील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी मिळेल. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्ही व्यावसायिक रचना आणि दीर्घकालीन फायद्यांचे बारकाईने मूल्यांकन करू, अशी माहिती एससी ॲग्रोटेकचे व्यवस्थापकीय संचालक प्रतिककुमार भरतभाई पटेल यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी