
मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून, ‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. हा बंध या दोघांचे आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, हे चित्रपटात पाहायला मिळेल.
‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून मराठी आणि हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन तसेच रंगभूमीवर अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रिया पिळगावकर यांना या चित्रपटाची भावनिक कथा विशेष भावली आणि त्यामुळेच त्यांनी या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा एक विशेष महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. तर सिद्धार्थ बोडके यांचा लव फिल्म्ससोबतचा हा दुसरा चित्रपट असून, यापूर्वी त्यांनी ‘देवमाणूस’ या चित्रपटात काम केले आहे.
‘तू आहेस ना’ या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात एका महत्त्वपूर्ण टप्प्याने होत आहे. गोव्यात होणाऱ्या ५७ व्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) २६ नोव्हेंबर रोजी गाला प्रीमियर विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार असून या महोत्सवाच्या गाला प्रीमियर विभागात प्रदर्शित होणारा ‘तू आहेस ना’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कामाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आले आहे.
चित्रपटाविषयी बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणतात, “आजच्या काळात ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि त्याचे महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावले. चित्रपटात या विषयाची केलेली मांडणी त्याचबरोबर मी साकारणारी व्यक्तिरेखा यामुळे मी या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी हा चित्रपट इफ्फीमध्ये पाहावा याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
आपला अनुभव सांगताना सिद्धार्थ बोडके म्हणतात, “ ‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. अभिनेता म्हणून मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्ससोबतचा हा माझा दुसरा प्रकल्प आहे. एका वेगळ्या कथेसाठी आणि स्वतःमधील अभिनयाचा नवा पैलू शोधण्याची संधी देणाऱ्या या टीमसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक होतो.”
दिग्दर्शक दिपक गावडे म्हणतात, “दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. विशेषतः ‘तू आहेस ना’ ही कथा माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. या चित्रपटाचा प्रतिष्ठित इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. प्रेक्षकांनी ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवावी.”
लव फिल्म्स प्रस्तुत ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर