
मुंबई, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत' पाचव्या सीझनसह परतत आहे. 'प्राइम व्हिडिओ'ने या नवीन सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यावेळी फुलैरामधील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत; गावच्या राजकारणातील नवीन संघर्षांसोबतच, प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्य, भावना आणि मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
'द व्हायरल फीव्हर' (TVF) निर्मित आणि दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित या सीरिजची कथा दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणभ कुमार यांनी लिहिली आहे. या नवीन सीझनमध्ये जितेंद्र कुमार पुन्हा एकदा 'सचिव जी'च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे कलाकारही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. फुलैरामध्ये आता नवीन 'मुखिया' (सरपंच) आहेत आणि 'प्रधान-पती'च्या भूमिकेत असलेला बनराकस आपल्या स्वतःच्या अजेंड्यासह सूत्रे हाती घेताना दिसणार आहे. त्याच्या निर्णयामुळे खरोखरच गावात काही बदल घडतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
'प्राइम व्हिडिओ इंडिया'चे मनीष मेन्घानी यांनी सांगितले की, गेल्या चार सीझन्समध्ये फुलैरा आणि तिथली पात्रे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. पाचव्या सीझनद्वारे ही लोकप्रिय कथा पुढे नेण्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले. TVF चे अध्यक्ष विजय कोशी यांनी सांगितले की, 'पंचायत'च्या यशाचे गमक त्याच्या वास्तववादी पात्रांमध्ये, अस्सल नात्यांमध्ये आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांमध्ये दडलेले आहे. आगामी सीझनमध्ये येणारी नवीन आव्हाने, बदलती नाती आणि अनपेक्षित वळणे पाहण्यासाठी ते अत्यंत उत्सुक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर