छाजेड यांच्यासारखे अष्टपैलू नेतृत्व पुन्हा होणे नाही : सुरेश भटेवरा
जयंतीनिमित्त कृतज्ञता कार्यक्रमात मान्यवरांकडून आठवणींना उजाळा नाशिक, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याच्या ध्येयाने काँग्रेस पक्षात निष्ठेने कार्य करताना कामगार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तृत
There will be no return of a


जयंतीनिमित्त कृतज्ञता कार्यक्रमात मान्यवरांकडून आठवणींना उजाळा

नाशिक, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याच्या ध्येयाने काँग्रेस पक्षात निष्ठेने कार्य करताना कामगार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्यासारखे अष्टपैलू नेतृत्व पुन्हा या जिल्ह्यात निर्माण होणे कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले.

१९८० च्या दशकात युवक काँग्रेसची भक्कम फळी उभी करून जिल्ह्यात नवीन नेतृत्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम जयप्रकाश छाजेड यांनी केले. महाराष्ट्रात मोठी कामगार चळवळ उभी करण्यातही त्यांचे योगदान मोलाचे होते. आपल्या कार्यातून त्यांनी जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला, असेही भटेवरा यांनी नमूद केले.

माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम दीपाळीनगर येथील जयप्रकाश छाजेड उद्यानात पार पडला. स्वराज फाउंडेशन, सुसंस्कार प्रतिष्ठान आणि स्वामी राज ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा ज्येष्ठ नेते विजय साने यांनी जयप्रकाश छाजेड यांच्यासोबतच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. छाजेड यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या काळातील विविध पक्षांच्या युवा कार्यकर्त्यांना त्यांचे कायम मार्गदर्शन लाभले, असे साने यांनी सांगितले.

शहराचे उपमहापौर विलास शिंदे यांनीही जयप्रकाश छाजेड यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून आजच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन केले.

प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा नाशिक जिल्ह्याचे प्रभारी जावेद फारुकी यांनी छाजेड यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदेश काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासोबतच त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पक्षाच्या कठीण काळातही काँग्रेसचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले, असे फारुकी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक गुरमीत बगा, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक राहुल दिवे, समीर कांबळे, यशवंत निकुळे, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई आणि नाशिक जिमखान्याचे चेअरमन नरेंद्र छाजेड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश छाजेड यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जयप्रकाश छाजेड यांच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande