
रत्नागिरी, 18 नोव्हेंबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरून दगड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहनतळ ते मंदिर आणि मंदिरापासून धबधब्यापर्यंत जाळीचे कुंपण घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.
मार्लेश्वर परिसरातील डोंगररांगेतून लहान-मोठे दगड खाली कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. नुकत्याच झालेल्या एका दुर्दैवी घटनेत डोंगरावरून दगड कोसळून एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या देवस्थान ट्रस्टने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले असले, तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घातले आहे.
देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, वाहनांच्या पार्किंगपासून मंदिरापर्यंत ९०० मीटर आणि मंदिरापासून धबधब्यापर्यंत २०० मीटर असा एकूण १,१०० मीटर लांबीचा परिसर मजबूत जाळीच्या कुंपणाने सुरक्षित केला जाणार आहे. तसेच, श्री मार्लेश्वर मंदिर ज्या नैसर्गिक गुहेत आहे, त्या गुहेच्या छताचे दगडही निसटत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी गुहेच्या छताला 'स्टीलडोम' बसवण्याचाही प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राला वर्षभर लाखो भाविक आणि पर्यटक भेट देत असतात. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जाळीच्या कुंपणाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या कामासाठी आवश्यक असलेली तांत्रिक आणि प्रशासकीय पूर्तता वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी