रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दूर होणार; मनसेच्या पाठपुराव्याला यश
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती लवकरच मोफत हेल्पलाइन सुरू होणार रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था रत्नागिरी, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा
वैद्यकीय अधीक्षकांशी मनसे नेत्यांची चर्चा


गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

लवकरच मोफत हेल्पलाइन सुरू होणार

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था

रत्नागिरी, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला लेखी आश्वासन दिले असून, रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रूपेश जाधव यांनी या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मेंदुविकार, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून, काही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र संपर्क कक्षाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच निःशुल्क हेल्पलाइन सेवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासोबतच उपचार प्रक्रियेतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.

रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवासाचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी रुग्णालय परिसरात स्वतंत्र तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून, यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. याशिवाय रुग्णालयाच्या मालकीच्या दोन रुग्णवाहिका नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना उत्तरोत्तर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना दिलासा देण्यासाठी मनसे कटिबद्ध आहे, असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मनसेच्या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलल्याबद्दल जाधव यांनी प्रशासनाचे स्वागत केले आहे. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande