
नाशिक, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ (आयटक) च्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेसमोर काळ्या साड्या परिधान करून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी केंद्रांमधून दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस शासनाच्या विविध योजना आणि सेवा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत; मात्र या योजनेला ५२ वर्षे पूर्ण होऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये दिलेल्या निर्णयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामगार म्हणून असलेल्या हक्कांना मान्यता देत ग्रॅच्युइटीच्या लाभाचा मार्ग मोकळा केला आहे.
गुजरात, हरियाना, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जात असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्रता नाराजी आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, यासाठी गेल्या वीस वर्षांपासून विविध प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत; मात्र अद्याप पेन्शन योजनेबाबत ठोस आदेश काढण्यात आलेले नाहीत. परिणामी, आयुष्यभर शासनाच्या योजना राबविणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे.
या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅच्युइटीचा लाभ तातडीने लागू करावा, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन सुरू करावी आणि प्रलंबित प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी नेते राजेश सिंग, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, पद्मा भुजबळ, संजीवनी वाघमारे, कुसुम गांगुर्डे, सुनंदा जाधव, लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरड, जिजा जगझाप, जिजाबाई अहिरराव, अन्नपूर्णा अडसुळे, आशा देवढे, छाया कोतवाल, अरुणा बाबा, कल्पना पाटील, मीराबाई जाधव, पूनम पाटील, राजश्री पानसरे, प्राजक्ता कापडणे आदी अंगणवाडी कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI