

* महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सुविधेचे लोकार्पण
* सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय तंत्रज्ञानामुळे रूग्णांचा प्रतिक्षा कालावधी कमी होणार
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबई सेंट्र्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय येथे अत्याधुनिक सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण महापौर रितू तावडे यांच्या हस्ते आज (१९ नोव्हेंबर) रोजी करण्यात आले. मुंबईची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि प्रगत निदान सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महानगरपालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे, असे उद्गार महापौरांनी काढले.
आमदार सुनिल शिंदे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेेडणेकर, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या तथा स्थानिक नगरसेविका अमरीन अब्राहानी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेविकाअबोली खाड्ये, नगरसेवक वकार खान, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण) तथा अधिष्ठाता बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. शैलेश मोहिते, केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या लाखो रुग्णांना केईएम, नायर रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. अनेक रुग्ण गुंतागुंतीचे आजार, मर्यादित आर्थिक साधने आणि सार्वजनिक रुग्णालयांवरील अपार विश्वास घेऊन मुंबईत येतात. सुलभ सेवा, गुणवत्तापूर्ण उपचार आणि सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे विश्वासाला पात्र ठरणे ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
केईएम आणि नायर रूग्णालयातील रेडिओलॉजी अर्थात क्ष - किरणशास्त्र विभागात सध्या उपलब्ध असलेल्या एका सीटी स्कॅनर आणि एका १.५ टेस्ला एमआरआय यंत्राच्या सहाय्याने दररोज सुमारे १०० ते १२० सीटी स्कॅन आणि २५ ते ३० एमआरआय तपासण्या केल्या जातात. ही आकडेवारी निदान सेवांची मोठी गरज आणि ती पूर्ण करण्यासाठी कार्यरत असलेल्या पथकाचे समर्पण, या दोन्ही बाबी अधोरेखित करते. या नव्या थ्री टेस्ला एमआरआय सुविधेमुळे आजारांचे निदान आणि उपचारांचे नियोजन यांसाठी विभागाची क्षमता लक्षणीयरीत्या बळकट होणार आहे. आवश्यक तपासण्या अधिक सुलभपणे उपलब्ध होणे आणि निदानाची खात्री वाढणे याबरोबरच, पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ व कार्यक्षम वेळापत्रक यांच्या साहाय्याने प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास आणि इतर केंद्रांवरील फेऱ्या टाळण्यास यामुळे मदत होईल, असा आशावाद महापौर तावडे यांनी व्यक्त केला.
सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय मशीनमुळे रूग्णांची वैद्यकीय चाचणी करण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. विविध चाचणीसाठी लागणारा सरासरी ४५ मिनिटांचा कालावधी हा १० मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे रूग्णांचा प्रतिक्षा कालावधी कमी होणार आहे. त्यासोबतच अधिकाधिक रूग्णांची चाचणी करणेही शक्य होणार आहे.
टेस्ला तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती
‘टेस्ला’ हे एमआरआय यंत्रातील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. थ्री टेस्ला यंत्राची चुंबकीय क्षेत्राची तीव्रता १.५ टेस्ला यंत्राच्या दुप्पट असते. यातून मिळू शकणाऱ्या अधिक प्रभावी संकेतांमुळे, योग्य तपासणी तंत्रांचा वापर केल्यास, शरीरातील लहान रचना आणि सूक्ष्म विकृती अधिक स्पष्टपणे पाहता येतात.
मेंदू, मज्जारज्जू, सांधे आणि शरीरातील इतर मऊ ऊतींच्या तपासणीसाठी अशा सविस्तर प्रतिमा विशेष उपयुक्त ठरतात. मेंदू व मज्जासंस्थेचे विकार, मणक्यांचे आजार, अस्थिबंध व कूर्चेच्या दुखापती आणि विविध गुंतागुंतीच्या आजारांच्या मूल्यमापनात या तपासणीची मदत होते. आजाराची व्याप्ती समजून घेणे, उपचारांचे नियोजन करणे आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद तपासणे यासाठीही डॉक्टरांना अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध होते.
एमआरआयमध्ये शरीराच्या अंतर्गत भागांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओलहरींचा वापर केला जातो. आयनीकरण करणाऱया किरणोत्सर्गाचा वापर होत नाही. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी प्रगत यंत्रणा, तपासणीपूर्वी रुग्णाची योग्य सुरक्षितता पडताळणी आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाचे कौशल्य यांचा समन्वय आवश्यक असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी