बांग्लादेशात हिंसाचाराला नवे वळण: ढाक्यात बॉम्बस्फोट, युनूस यांच्या घरावर हल्ला,५६५ जणांना अटक
ढाका, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात राजकीय हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाका येथे पहाटे कच्च्या बॉम्बचे स्फोट झाले. तर अंतरिम सरकारचे माजी प
बांगलादेशात राजकीय संघर्ष पेटला: ढाक्यात बॉम्बस्फोट, युनूस यांच्या घरावर हल्ला,५६५ जणांना अटक


ढाका, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात राजकीय हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाका येथे पहाटे कच्च्या बॉम्बचे स्फोट झाले. तर अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या चटगावमधील वडिलोपार्जित घराला आग लावण्यात आली. त्यांच्या ग्रामीण बँकेच्या अनेक शाखांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या हिंसाचारात किमान चार जण जखमी झाले आहेत. देशातील अनेक भागांत जाळपोळ, तोडफोड आणि बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत.

चटगावमधील पंचलाईश परिसरात अज्ञात व्यक्तींनी मोहम्मद युनूस यांच्या वडिलांच्या घराला आग लावली. यापूर्वी देशाच्या विविध भागांतील त्यांच्या ग्रामीण बँकेच्या अनेक शाखाही जाळण्यात आल्या होत्या. ढाका येथे अवामी लीगच्या दोन नेत्यांच्या घरांवर हल्ले आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या आहेत. तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या किमान दोन कार्यालयांना आणि एका नेत्याच्या घरालाही आग लावण्यात आली. गेल्या दोन दिवसांत अवामी लीगच्या किमान दोन पक्ष कार्यालयांसह पक्षाच्या नेत्यांच्या पाच मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले आहे.

देशातील ६४ पैकी २८ प्रशासकीय जिल्ह्यांत वाहनांची जाळपोळ आणि डझनभर कच्च्या बॉम्बचे स्फोट घडवण्यात आले. अवामी लीगने गुरुवारी देशव्यापी बंद पुकारला होता. ही तारीख गेल्या वर्षी विशेष न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या आसपास आहे. हसीना ७९ वर्षांच्या असून, ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थी आंदोलनानंतर त्यांचे सरकार कोसळल्याने त्या बांगलादेश सोडून भारतात आल्या होत्या. बांगलादेश सरकार भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. हसीना यांनी डिसेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राजकीय तणाव वाढला असून, त्यांच्या समर्थकांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

हिंसाचार रोखण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी ढाका शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवून प्रमुख उड्डाणपुलांवर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.शहराच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर वाहनांची तपासणी सुरू आहे.ढाका येथे २४ तासांच्या विशेष मोहिमेदरम्यान ५६५ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये हसीना सरकारमधील माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांचाही समावेश आहे.

संवेदनशील जिल्ह्यांमध्ये, विशेषतः गोपालगंज येथे, बॉर्डर गार्ड बांगलादेशचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत.पंतप्रधान तारिक रहमान यांनी बीएनपीच्या खासदारांना आपापल्या मतदारसंघांत परत जाऊन कार्यकर्त्यांसोबत सक्रिय राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान तारिक रहमान यांनी अवामी लीगला दहशतवादी संघटना आणि फॅसिस्ट शक्ती संबोधत, तिला पुन्हा उदयास येऊ देण्यास विरोध केला आहे. त्यांनी लोकशाहीवादी शक्तींना एकजूट होण्याचे आवाहन केले. २०२४ प्रमाणेच अशा शक्तींना पुन्हा निर्णायकपणे पराभूत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, बीएनपी नेत्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत काम करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, पश्चिम नाराइल जिल्ह्यात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात सत्ताधारी पक्षाच्या दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू झाला. फरिदपूर आणि पिरोजपूर येथेही हिंसाचारात बीएनपीचा एक नेता आणि एका वाहतूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

मोहम्मद युनूस यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी हसीना सरकार कोसळल्यानंतर अंतरिम सरकारची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या सरकारने अवामी लीगवर बंदी घातली आणि पक्षाच्या हजारो नेते व कार्यकर्त्यांना तुरुंगात पाठवले. याच काळात शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या धनमंडी येथील घरालाही अनेक टप्प्यांत आग लावून आणि तोडफोड करून उद्ध्वस्त करण्यात आले होते. आता युनूस यांच्या घरावर आणि ग्रामीण बँकेवर झालेल्या हल्ल्यांमुळे हिंसाचाराला नवे वळण मिळाले आहे. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी सांगितले की, जाळपोळ आणि हिंसाचार करणाऱ्यांची ओळख ध्वनिचित्रफिती आणि व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे पटवली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande