
वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।नासाच्या व्हॉयेजर-१ या अंतराळयानाने पृथ्वीपासून १ प्रकाशदिन म्हणजेच सुमारे २५.९ अब्ज किलोमीटर अंतर पार करून इतिहास रचला आहे. अंतराळात इतके प्रचंड अंतर पार करणारे हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान ठरले आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने सुमारे पाच दशकांपूर्वी, ५ सप्टेंबर १९७७ रोजी हे अंतराळयान प्रक्षेपित केले होते.
१८ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी या अंतराळयानाने १ प्रकाशदिनाचे अंतर पार केले.नासाने हे अंतराळयान ५ सप्टेंबर १९७७ रोजी टायटन-३ई सेंटॉर रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित केले होते. पाच वर्षांच्या ग्रहविषयक मोहिमेसाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. ५ मार्च १९७९ रोजी हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे ७८ कोटी किलोमीटर दूर असलेल्या गुरू ग्रहाच्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर १२ नोव्हेंबर १९८० रोजी ते शनी ग्रहाच्या कक्षेत दाखल झाले.२५ ऑगस्ट २०१२ रोजी व्हॉयेजर-१ ने पृथ्वीपासून सुमारे १८.२ अब्ज किलोमीटर अंतर पार करून हेलिओपॉज गाठला होता. आता १८ नोव्हेंबर २०२६ रोजी २५.९ अब्ज किलोमीटरचे अंतर पार करत त्याने नवा इतिहास रचला आहे.
या अंतराळयानाने गुरू आणि शनी ग्रहांच्या कक्षेत प्रवेश करून या ग्रहांचे तसेच त्यांच्या उपग्रहांचे छायाचित्रे आणि विविध माहिती पृथ्वीवर पाठवली. या माहितीच्या आधारे या ग्रहांचा आणि त्यांच्या उपग्रहांचा अभ्यास करणे शक्य झाले.व्हॉयेजर-१च्या मदतीने नासाला शनीच्या टायटन या उपग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यातही यश आले. या अभ्यासातून टायटनच्या वातावरणात सुमारे ९० टक्के नायट्रोजन वायू असल्याचे समोर आले.
व्हॉयेजर-१ सध्या सूर्याच्या प्रभावक्षेत्रातून म्हणजेच हेलिओस्फिअरच्या बाहेर गेले असून, ताऱ्यांमधील अवकाश अर्थात आंतरतारकीय अवकाशात प्रवास करत आहे.व्हॉयेजर-१ची वैशिष्ट्येनासाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, व्हॉयेजर-१चे वजन १,५९२ पौंड म्हणजेच सुमारे ७२१.९ किलोग्रॅम आहे. या अंतराळयानात तीन मल्टी-हंड्रेड वॅट रेडिओआइसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने अंतराळयानाला विद्युत ऊर्जा मिळते. हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी नासाने टायटन-३ई सेंटॉर रॉकेटचा वापर केला होता.
या अंतराळयानात विविध वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामध्ये इमेजिंग सायन्स सिस्टीम (आयएसएस), अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर (यूव्हीएस), इन्फ्रारेड इंटरफेरोमीटर स्पेक्ट्रोमीटर (आयआरआयएस), प्लॅनेटरी रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी एक्सपेरिमेंट (पीआरए), फोटो पोलॅरिमीटर (पीपीएस), कॉस्मिक रे टेलिस्कोप (सीआरएस), रेडिओ सायन्स सिस्टीम (आरएसएस), लो एनर्जी चार्ज्ड पार्टिकल्स एक्सपेरिमेंट (एलईसीपी), प्लाझ्मा वेव्ह्स एक्सपेरिमेंट (पीडब्ल्यूएस), प्लाझ्मा स्पेक्ट्रोमीटर (पीएलएस) आणि ट्रायअॅक्सियल फ्लक्सगेट मॅग्नेटोमीटर (एमएजी) यांचा समावेश आहे.
ही वैज्ञानिक उपकरणे अंतराळातील विविध घटकांचा अभ्यास करून माहिती गोळा करण्यास व्हॉयेजर-१ला मदत करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode