
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। 'सन मराठी'वरील 'तू अनोळखी तरी सोबती' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील समीर व अर्पिता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. सध्या मालिकेत अर्पिता नीलांबरीचा विरोध असूनही घरात प्रवेश करते. नीलांबरी व राजसीने कितीही कात कारस्थाने रचली तरीही समीर- अर्पिता वेगळे होत नसल्याचं दिसून येतंय. प्रेक्षकांनी प्रेमाने समीरला ग्रीन फ्लॅग असं देखील नाव दिलं आहे. अशातच आज पुरुष दिनानिमित्त मालिकेतील अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाणने शुभेच्छा देत या दिनानिमित्त तिचं मत व्यक्त केलं आहे. महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र पुरुष दिनाबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती आहे.
याबद्दल बोलताना योगिता म्हणाली की, “महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मोठे कार्यक्रम होतात, पण पुरुष दिन आहे आणि तो कधी असतो, हेच अनेकांना माहीत नाही. याबद्दल जाणीव असणं गरजेचं आहे. आपण कितीही स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोललो, तरी हा समतोल राखण्यासाठी पुरुषांचीही गरज आहे. जशी पुरुषाला स्त्रीची गरज आहे, तशीच स्त्रीलाही पुरुषाची गरज आहे. आपले बाबा, भाऊ किंवा जोडीदार या प्रत्येक नात्यात पुरुषांची साथ महत्त्वाची असते. त्यामुळे पुरुषांचंही कौतुक होणं गरजेचं आहे.
यापुढे योगिता म्हणाली की, आमच्या सेटवर तीन वेगवेगळ्या वयोगटांतील पुरुष आहेत. मोठ्या वयाचे कलाकार वडिलांप्रमाणे सगळ्यांची काळजी घेतात. आमच्या वयाचे कलाकारही प्रत्येकाला समजून घेऊन मदत करतात. तर लहान वयातील अगस्त्यसारखी मुलंही महिलांची काळजी घेतात. तो खूप लहान आहे, पण खूप समजूतदार आहे. सेटवर कोणाला काही हवं आहे का, याची तो नेहमी विचारपूस करतो. एकदा मी त्याला केक दिला होता, पण त्याने तो स्वतः न खाता आईसाठी घेऊन गेला. अशा छोट्या गोष्टींमधून त्याचे चांगले संस्कार दिसून येतात. मुलांमध्ये लहान वयात इतकी समज असणं खरंच कौतुकाची बाब आहे. एकंदरीतच आमच्या मालिकेच्या टीममधील सगळी पुरुष मंडळी खूप भन्नाट आहेत. मला वाटतं आजची पिढी खूप समजूतदार झाली आहे. महिलांना समजून घेऊन त्यांना साथ देते. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अशा पुरुषांचं कौतुक करण्यासाठी पुरुष दिन साजरा झालाच पाहिजे. जगातील माझ्या सर्व भावांना आणि पुरुषांना पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढची पिढीही स्त्रियांना साथ देत एकत्र पुढे जाईल, अशी आशा आहे. ”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर