
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या रहस्याचा उलगडा होणार असून सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. जाणून घेऊया, झी मराठीच्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार आहे.
वीण दोघांतली ही तुटेना मध्ये बाळाच्या विचाराने स्वानंदी सतत तणावात आहे. स्वानंदीला आनंदी ठेवण्यासाठी समर वेगवेगळे प्रयत्न करतोय. दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी अंशुमनला घरी बोलावले नसल्यामुळे सुश्मिता गोंधळ घालते आणि यासाठी समरला जबाबदार धरते. समर आपल्या कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय असल्यामुळे तो स्वानंदीला ऑफिसमध्ये थांबून प्रेझेंटेशन पूर्ण करण्यास सांगतो. मात्र, काम करत असताना तिची काळजी घेणेही तो विसरत नाही. तिच्यासाठी जेवण आणण्यापासून ते तिची काळजी घेण्यापर्यंत पती म्हणून आपली प्रत्येक जबाबदारी तो पार पडणार आहे. काम संपल्यानंतर दोघेही घरी परतत असताना वाटेत अंशुमनने पाठवलेले गुंड त्यांच्यावर हल्ला करणार आहेत.
दीपज्योती मध्ये ज्योतीच्या आईने दिवाळीच्या जेवणासाठी दीपला घरी बोलावण्यास सांगितले आहे. आईच्या आग्रहामुळे नाइलाजाने ज्योती दीपला फोन करून घरी येण्याचे आमंत्रण देते. दिवाळीच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र जमणार आहेत. मात्र, दीप आणि ज्योती यांच्यातील तणाव आणि अवघडलेपणा स्पष्टपणे जाणवतो. यादरम्यान ज्योतीची आई सर्वांना फोटो काढण्यासाठी एकत्र उभे राहण्यास सांगते. या फोटोत दीप आणि पुरुषोत्तम एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. ज्योतीच्या आईला तिच्या पश्चात ज्योतीच्या भविष्याचे काय होईल, या विचाराने ती अस्वस्थ आहे. ज्योतीसाठी दीपच योग्य जोडीदार असल्याच तिच्या मनात आहे. त्यामुळे ती ज्योतीकडून दीपशी लग्न करण्याचे वचन मागणार आहे. दुसरीकडे, आत्या देखील दीप आणि ज्योतीला एकत्र आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतेय. आता ज्योती आपल्या आईच्या इच्छेला मान देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर