नामिबियाने पूर्ण सदस्य राष्ट्राविरुद्ध पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकत रचला इतिहास
विंडहोक (नामिबिया), 02 नोव्हेंबर (हिं.स.)नामिबियाने इतिहास घडवला. विंडहोक येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात आयर्लंडचा पाच गडी राखून पराभव करत, नामिबियाने एखाद्या पूर्ण सदस्य देशाविरुद्ध आपली पहिली द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली. या
नामिबियाचा क्रिकेट संघ


विंडहोक (नामिबिया), 02 नोव्हेंबर (हिं.स.)नामिबियाने इतिहास घडवला. विंडहोक येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात आयर्लंडचा पाच गडी राखून पराभव करत, नामिबियाने एखाद्या पूर्ण सदस्य देशाविरुद्ध आपली पहिली द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली. या विजयामुळे नामिबियाने आपल्या घरच्या मैदानावर पाच सामन्यांची वनडे मालिका ३-२ अशी जिंकली. हा विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, कारण पुढील वर्षी होणाऱ्या 'आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषका'ची तयारी करत असताना, हा निकाल त्यांना मोठा आत्मविश्वास देणारा आहे.

नामिबियाच्या वेगवान गोलंदाजांनी—जे.जे. स्मिथ आणि जॅक ब्रॅसेल—उत्कृष्ट गोलंदाजी करत एकूण सात बळी मिळवले आणि आयर्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात, सलामीवीर लॉरेन स्टीनकॅम्पने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डावाला आधार दिला, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने ३० धावांचे योगदान दिले. यामुळे यजमान संघाने पाच गडी राखून सहज विजय मिळवला.गेरहार्ड इरास्मसला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पाच सामन्यांत एकूण २६३ धावा केल्या आणि चार बळीही मिळवले. मालिकेतील निर्णायक सामन्यात नऊ षटकांत केवळ २० धावा देऊन ४ बळी घेणाऱ्या जे.जे. स्मिथला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.

आयर्लंडला संपूर्ण डावादरम्यान लय मिळवण्यात अपयश आले. त्यांच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. नामिबियाने ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला, तर आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर आपल्या संघाच्या कामगिरीमुळे निराश झाला. टकर म्हणाला, आमच्यासाठी हा दिवस नक्कीच निराशाजनक होता. तो पुढे म्हणाला, आम्ही आजच्या सामन्याकडे मोठ्या आशेने पाहत होतो, कारण मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र, तांत्रिक कौशल्याच्या बाबतीत आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. आम्ही खूप काही शिकलो आहोत, पण भविष्याचा विचार करता आम्हाला अनेक गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नामिबियाचे कौतुक करायला हवे; त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध क्रिकेट खेळले आणि आमच्यापेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिले. म्हणूनच त्यांनी आज मालिका जिंकली.

आयर्लंडने आयसीसी पुरुष वनडे सांघिक क्रमवारीत आपल्या स्थानाच्या जोरावर पुढच्या वर्षी होणाऱ्या 'आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धे'त आपले स्थान निश्चित केले आहे, तर नामिबियाला कदाचित 'आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ' द्वारे आपले स्थान मिळवावे लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande