न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत रोहितपेक्षा विराट जास्त शतके करू शकतो : चेतेश्वर पुजारा
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे मत आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीचे शतक करण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी त्याने दोन्ही खेळाडूंची फलंदाजीतील भूम
विराट कोहली


नवी दिल्ली, २ नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे मत आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीचे शतक करण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी त्याने दोन्ही खेळाडूंची फलंदाजीतील भूमिका आणि खेळपट्टीची परिस्थिती ही कारणे दिली. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने न्यूझीलंडसाठी दोन वेगवेगळ्या एकदिवसीय संघांची निवड आणि संघातून यशस्वी जैस्वालला वगळण्यावर आपले मत व्यक्त केले.

पुजारा म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून देणे ही रोहित शर्माची भूमिका आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर ही भूमिका बदलू शकते आणि त्याला शतक करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. मात्र, विराट कोहलीचे शतक करण्याची शक्यता किंचित जास्त आहे, कारण तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि डावाला स्थैर्य देण्याची त्याची भूमिका असते.

तो म्हणाला, विराटचा खेळ डाव सांभाळण्यावर आधारित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूसाठी शतक करणे थोडे सोपे असते. सलामीवीराची भूमिकाही निश्चित असते, पण न्यूझीलंडच्या परिस्थितीत ती काही प्रमाणात बदलू शकते. त्यामुळे, मला वाटते की न्यूझीलंडविरुद्ध शतक करण्याची शक्यता रोहितपेक्षा विराटची जास्त आहे.

अभिषेक नायरने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी कसोटी मालिका भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, गेल्या वेळी जेव्हा न्यूझीलंडने भारताचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी कसोटी मालिका जिंकली होती, ज्यामुळे भारतीय चाहते निराश झाले होते. त्यामुळे, भारताला आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल.

नायर म्हणाला, न्यूझीलंड भारतात आले आणि त्यांनी आम्हाला कसोटी मालिकेत पराभूत केले. त्यामुळे मला आणि इतर चाहत्यांनाही दुःख झाले. ही एक मोठी मालिका आहे. विश्वचषक महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी अजून वेळ आहे. माझ्यासाठी, ही कसोटी मालिका गौतम गंभीर आणि भारतीय चाहत्यांसाठी निर्णायक आहे.

यशस्वी जैस्वालला एकदिवसीय संघातून वगळण्याबाबत नायर म्हणाला की, निवड समितीने कदाचित त्याच्याशी या विषयावर चर्चा केली असेल. तो म्हणाला की, रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करत असल्यामुळे जैस्वालला एकदिवसीय संघात संधी मिळाली नसेल. अशा परिस्थितीत, कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला हवे.

नायरच्या मते, जैस्वालला असे सांगण्यात आले असेल की, एकदिवसीय संघात त्याचा समावेश न झाल्यामुळे, तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळून आपली तयारी सुधारू शकतो. यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या विजयात योगदान देण्याची चांगली संधी मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande