
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.) - ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पवारांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना दाखल केल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला (जि. सोलापूर) भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. मात्र, आज होणारा शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचं कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पवार हे सोलापूरहून पुण्याला आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार आल्या. पवारांना कफ झाला होता. तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शदर पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. खोकल्याचा त्रास झाल्यामुळे बाबांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबाबत आणि दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार मानते.
दिवाळीनंतर शरद पवार हे करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी करणार आहे. काल रात्री बारामती, भिगवण परिसरात मोठा पाऊस झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. करमाळ्यात दिवाळीनंतर शरद पवार नक्की पाहणी करतील, असं सांगतानाच पवारांना भेटूनच मी करमाळ्याला गेलो होतो. मी दौऱ्याची तयारी करत होतो, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी