
* पहिल्या टप्प्यात १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांचा समावेश
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.)
: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहन असे तीन घटक समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमुक्ती घटकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करून १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएस नुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम यांचा समावेश आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील तपासून ओटीएस नुसार त्यांच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यात ओटीएस नुसार बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये.
शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकेकडून पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल. शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम जमा केल्याची खातरजमा झाल्यानंतर थकबाकी अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या तसेच योजनेच्या निकषांनुसार संबंधित बँकेत आपल्या हिश्श्याची रक्कम जमा केलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. शासनाकडून ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत आहे.
विभागनिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नाशिक विभागात सर्वाधिक ४८,३७९ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यानंतर पुणे विभागातील ४०,९४६, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३९,५९७, अमरावती विभागातील २५,९१७, नागपूर विभागातील १२,००२ आणि कोकण विभागातील २,९७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही ओटीएस अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
योजनेअंतर्गत मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासंदर्भात १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी