जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोनं ६ हजारांनी, तर चांदी १० हजारांनी स्वस्त जळगाव, २० नोव्हेंबर (हिं.स.) : सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र अद्यापही कायम असून, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदविण्यात आली.
सोने-चांदी लोगो


सोनं ६ हजारांनी, तर चांदी १० हजारांनी स्वस्त

जळगाव, २० नोव्हेंबर (हिं.स.) : सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र अद्यापही कायम असून, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदविण्यात आली. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो १० हजार रुपयांची घट झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याने दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ७० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपये होता. त्याच दिवशी चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ८८ हजार रुपये नोंदविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लक्ष्मीपूजनापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे १८ हजार रुपये, तर चांदीच्या दरात तब्बल ३३ हजार रुपयांची घट झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारातील शुक्रवारच्या दरानुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५०० रुपयांवर आला आहे. गुरुवारच्या तुलनेत सोन्याच्या दोन्ही प्रकारांत ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी प्रतिकिलो १ लाख ६५ हजार रुपये असलेली चांदी शुक्रवारी १ लाख ५५ हजार रुपयांवर आली. त्यामुळे एका दिवसात चांदीच्या दरात किलोमागे १० हजार रुपयांची घट झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरांमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी संबंधित सराफ व्यावसायिकांकडून अंतिम दर, जीएसटी आणि घडणावळीसह दागिन्यांची किंमत तपासून घ्यावी.आता आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण कायम राहते की पुन्हा दरांमध्ये वाढ होते, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande