सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सची नीचांकी पातळीवरून १,६३४ अंकांची झेप
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने आज सलग दुसऱ्या दिवशी शानदार तेजी नोंदवत व्यवहाराचा शेवट केला. आजच्या व्यवहाराची सुरुवात मात्र घसरणीसह झाली होती. बाजार उघडताच जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आण
Stock Market Closing


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने आज सलग दुसऱ्या दिवशी शानदार तेजी नोंदवत व्यवहाराचा शेवट केला. आजच्या व्यवहाराची सुरुवात मात्र घसरणीसह झाली होती. बाजार उघडताच जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमधील घसरण आणखी वाढली. मात्र, काही वेळातच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण खरेदी आणि बँकिंग तसेच आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक नऊ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद होण्यात यशस्वी ठरले. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.०८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १.१२ टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी ४६३.५० अंक म्हणजेच ०.५६ टक्क्यांच्या घसरणीसह ८२,५५८.२५ अंकांच्या पातळीवर उघडला होता. व्यवहाराला सुरुवात होताच सुरुवातीच्या विक्रीच्या दबावामुळे हा निर्देशांक ६१८.४८ अंक म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी घसरून ८२,४०३.२७ अंकांच्या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी वाढल्याने सेन्सेक्सने जोरदार पुनरागमन केले.

सातत्याने होत असलेल्या खरेदीच्या जोरावर हा निर्देशांक दिवसातील नीचांकी पातळीवरून १,६३४.६९ अंकांनी उसळून १,०१६.२१ अंक म्हणजेच १.२२ टक्क्यांच्या वाढीसह ८४,०३७.९६ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, अखेरच्या सत्रात उच्चांकी पातळीवर किरकोळ नफावसुली झाल्यामुळे निर्देशांकाच्या तेजीचा वेग काहीसा मंदावला. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकी पातळीवरून ११८.२५ अंकांनी घसरून ८९७.९६ अंक म्हणजेच १.०८ टक्क्यांच्या वाढीसह ८३,९१९.७१ अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ५० निर्देशांकानेही आज घसरणीसह सुरुवात केली. हा निर्देशांक आज १४६.३० अंक म्हणजेच ०.५७ टक्क्यांनी घसरून २५,३६८ अंकांवर उघडला. बाजार उघडल्यानंतर लगेचच सुरुवातीच्या दबावामुळे हा निर्देशांक १६९.१० अंक म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घसरून २५,३४५.२० अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या घसरणीनंतर काही वेळातच खरेदीदारांनी खालच्या पातळीवर जोरदार खरेदी सुरू केली. त्यामुळे निफ्टीच्या निर्देशांकात मोठी उसळी पाहायला मिळाली.

सातत्याने सुरू असलेल्या खरेदीमुळे हा निर्देशांक दिवसातील नीचांकी पातळीवरून ४६० अंकांपेक्षा अधिक उसळून २९४.५० अंक म्हणजेच १.१५ टक्क्यांच्या वाढीसह २५,८०० ही महत्त्वाची मानसिक पातळी ओलांडत २५,८०८.८० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसभरातील चढ-उतारानंतर निफ्टी ५० निर्देशांक २८६.३० अंक म्हणजेच १.१२ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह २५,८००.६० अंकांवर बंद होण्यात यशस्वी ठरला.

क्षेत्रीय आघाडीवर आज बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक ३.०१ टक्के आणि निफ्टी बँक निर्देशांक २.३९ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आयटी, आरोग्यसेवा आणि सिमेंट निर्देशांकांमध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे, धातू आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये नफावसुलीचा दबाव कायम राहिला. त्यामुळे हे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारात आज संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह, तर स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.१३ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला.

आज शेअर बाजारात झालेल्या या शानदार तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य आजच्या व्यवहारानंतर वाढून ५१४.१७ लाख कोटी रुपये (तात्पुरते) झाले. तर मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या कंपन्यांचे बाजारमूल्य ५१३.१४ लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे आजच्या व्यवहारातून गुंतवणूकदारांना सुमारे १.०३ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.

आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान मुंबई शेअर बाजारात ४,३९२ समभागांमध्ये सक्रिय खरेदी-विक्री झाली. यापैकी १,६६२ समभाग वाढीसह बंद झाले, तर २,५३० समभागांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. २०० समभाग कोणताही बदल न होता स्थिर राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारातही मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमधील दबावामुळे घसरण झालेल्या समभागांची संख्या अधिक होती. राष्ट्रीय शेअर बाजारात आज ३,३३५ समभागांमध्ये सक्रिय खरेदी-विक्री झाली. त्यापैकी १,२६८ समभाग नफा कमावत हिरव्या रंगात, तर २,०६७ समभाग तोटा सहन करत लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० समभागांपैकी २० समभाग वाढीसह, तर १० समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या ५० समभागांपैकी ३२ समभाग हिरव्या रंगात, तर १८ समभाग लाल रंगात बंद झाले.

आज दिवसभराच्या व्यवहारानंतर राष्ट्रीय शेअर बाजारात अपोलो हॉस्पिटल्सचा समभाग ५.२९ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह ९,२०० रुपयांवर बंद झाला. त्यामुळे तो सर्वाधिक नफा मिळवणारा समभाग ठरला. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या समभागात ४.७२ टक्क्यांची वाढ होऊन तो १,४४६ रुपयांवर, मॅक्स हेल्थकेअरचा समभाग ३.८८ टक्क्यांच्या वाढीसह १,०८१ रुपयांवर, मारुती सुझुकीचा समभाग ३.११ टक्क्यांच्या वाढीसह १४,०११ रुपयांवर आणि अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग ३.०२ टक्क्यांच्या वाढीसह १२,९३९ रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे हे पाच समभाग आजच्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या समभागांच्या यादीत समाविष्ट झाले.

दुसरीकडे, आजच्या व्यवहारात विक्रीच्या दबावामुळे घसरलेल्या समभागांमध्ये टायटन कंपनीचा समभाग १.७० टक्क्यांच्या घसरणीसह ४,६२० रुपयांवर बंद झाला. त्यामुळे तो सर्वाधिक घसरण नोंदवणारा समभाग ठरला. याशिवाय टाटा स्टीलचा समभाग १.६० टक्क्यांनी घसरून १७८ रुपयांवर, एनटीपीसीचा समभाग १.०८ टक्क्यांच्या घसरणीसह ३२१.५० रुपयांवर, हिंदुस्तान युनिलिव्हरचा (एचयूएल) समभाग १.०५ टक्क्यांच्या घसरणीसह २,०५२.५० रुपयांवर आणि जिओ फायनान्शियलचा समभाग ०.८१ टक्क्यांच्या घसरणीसह २२४.९७ रुपयांवर बंद झाला. या पाच समभागांचा आज सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांच्या यादीत समावेश झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande