
कोल्हापूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत शेंडा पार्क येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या २५० खाटांच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयास (कॅन्सर हॉस्पिटल) कर्करोग उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची व अत्याधुनिक असलेली 'लिनॅक ॲक्सिलेटर' (LINAC Accelerator) ही रेडिएशन उपचार प्रणाली उभारण्यास नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) सीएसआर निधीतून मदत मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी 'एनएसई फाऊंडेशन'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती रिमा मोहन आणि त्यांच्या पथकाने शेंडा पार्क येथील नियोजित कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामास प्रत्यक्ष भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या 'महाकेअर फाऊंडेशन'चे समन्वयक (मा. मुख्यमंत्री कार्यालय) श्री. गणेश खुडे आणि मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या ' ॲक्ट्रेक' (ACTREC) संस्थेचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक श्री. पुनीथ थाटीकोंडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यानंतर विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीस २५० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम करणाऱ्या 'एचएससीसी' (HSCC) कंपनीचे प्रतिनिधी, सी.पी. आर. रुग्णालयातील क्ष-किरणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल पाटील, रेडिएशन ऑन्कॉलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशील मेश्राम, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. उल्लास मिसाळ, सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय देसाई, सी.पी.आर. रुग्णालयांचे उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, प्रशासकीय अधिकारी श्री. मानसिंग जगताप तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ व सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते.
बैठकीत बांधकाम करणाऱ्या 'एचएससीसी' (HSCC) कंपनीचे प्रतिनिधी यांनी सादरीकरणाद्वारे (Power Point Presentation) नियोजित कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाची सद्यस्थिती, यंत्रणेची माहिती दिली. त्यांनतर अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील पदनिर्मिती बाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाकेअर फाऊंडेशनचे समन्वयक श्री. गणेश खुडे यांनी सांगितले की, राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील 'महाकेअर फाऊंडेशन'च्या माध्यमातून आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या रुग्णसेवेच्या दूरदृष्टीकोनातून पश्चिम महाराष्ट्रातील गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात दर्जेदार कर्करोग उपचार मिळावेत, हा शासनाचा मानस आहे.
सादरीकरण आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर एनएसई फाऊंडेशनच्या सीईओ श्रीमती रिमा मोहन यांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात 'लिनेंक ॲक्सिलेटर' यंत्रणा उभारण्यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मक सहमती दर्शवली. या प्रकल्पाची पुढील कार्यवाही गतीने पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे:
तांत्रिक पाहणीः महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या 'अॅक्ट्रेक' (ACTREC) संस्थेस भेट देऊन 'लिनेंक' यंत्रणा, त्यासाठी लागणारी अतिरिक्त उपकरणे व पायाभूत सुविधांचा तांत्रिक आढावा घ्यावा.
प्रस्ताव सादरीकरणः सर्व आवश्यक अतिरिक्त उपकरणांचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव (Comprehensive Docket) तयार करून तो एनएसईच्या खरेदी विभागाकडे (NSE Procurement Team) सादर करावा.
सामंजस्य करार (MoU): महाकेअर फाऊंडेशनचे समन्वयक श्री. गणेश खुडे यांनी सामंजस्य करारातील सहभागी पक्ष निश्चित करून दि. २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागांचे सचिव स्तरावर चर्चा पूर्ण करावी. त्यानंतर एनएसई फाऊंडेशनमार्फत सामंजस्य कराराचा मसुदा तयार करून सर्व संबंधित विभागांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल,
या प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे म्हणाले की, राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालिका डॉ. पल्लवी सापळे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे व पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोल्हापूरमध्ये साकार होत आहे. तसेच, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील गरीब व गरजू कर्करोग रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या अत्याधुनिक उपचार प्रणालीसाठी सहकार्य केल्या बद्दल आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar