
भाजपचे सहा नगरसेवक; शिवसेना-मनसे आघाडीला दोन, तर उबाठा-काँग्रेस आघाडीला दोन जागा
नाशिक, २० नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. न्यायालयीन लढाई, पक्षांतर्गत मतभेद आणि नियुक्ती प्रक्रियेतील विलंबानंतर आज (दि. २० नोव्हेंबर) दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत या दहा सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
महापालिकेची आज दुपारी दोन वाजता महासभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेपुढील पहिल्याच विषयात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला.नगरसचिव संजय नेरकर यांनी नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावाचे वाचन केले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या पक्ष आणि आघाड्यांच्या अधिकृत गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची छाननी तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली.
भाजपला सहा, तर इतर आघाड्यांना प्रत्येकी दोन जागा
स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपने सर्वाधिक सहा जागांवर बाजी मारली आहे. शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीला दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस शहर विकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत.
नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांची संपूर्ण यादी
भाजप (६ जागा) -
अजित चव्हाण,
हेमंत धात्रक,
संदीप लेनकर,
रोहिणी नायडू,
रामहरी संभेराव,
चंद्रशेखर पंचाक्षरी
शिवसेना-मनसे शहर विकास आघाडी (२ जागा)
-
विनायक आढाव आणि
चंद्रकांत लवटे
शिवसेना उबाठा-काँग्रेस शहर विकास आघाडी (२ जागा)
-
हेमंत गायकवाड
आणि बाबासाहेब गायकवाड
नवनियुक्त सदस्यांचा महासभेत सत्कार
स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा होताच महासभेच्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी नवनियुक्त सदस्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे अभिनंदन केले तसेच सत्कार केला.
दरम्यान, या नियुक्त्यांमुळे नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दहा नवीन सदस्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI