टॉप १० कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी उलथापालथ; जिओला मागे टाकत एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर, एनएसईचीही टॉप १० मध्ये एन्ट्री
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली विक्रमी खरेदी आणि बँकिंग समभागांमध्ये झालेली जोरदार तेजी यामुळे या आठवड्यात मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सर्वाधिक मूल्यवान टॉप १० कंपन्यांच्या यादीत मोठे बदल पाहायला मिळाले. या बदला
Top 10 Companies Market Cap


नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली विक्रमी खरेदी आणि बँकिंग समभागांमध्ये झालेली जोरदार तेजी यामुळे या आठवड्यात मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सर्वाधिक मूल्यवान टॉप १० कंपन्यांच्या यादीत मोठे बदल पाहायला मिळाले. या बदलामुळे एचडीएफसी बँकेने जिओ प्लॅटफॉर्म्सला मागे टाकत पुन्हा एकदा तिसरे स्थान मिळवले आहे. तर काही दिवसांपूर्वीच शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने उत्कृष्ट कामगिरी करत टॉप १० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याचवेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) टॉप १० च्या यादीतून बाहेर पडले आहे.

देशांतर्गत शेअर बाजारात या आठवड्यात नोंदवण्यात आलेल्या २.९ टक्क्यांच्या जोरदार तेजीचा थेट फायदा देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांना झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईमध्ये सूचिबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी वाढून ५१४.१८ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले. मागील आठवड्याच्या तुलनेत बँकिंग, दूरसंचार आणि वित्तीय क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मूल्यांकनात मोठी वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे टॉप १० कंपन्यांच्या क्रमवारीतही बदल झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या आठवड्यातही १८,६०,८५९.४० कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी म्हणून पहिल्या स्थानावर कायम राहिली. शुक्रवारी कंपनीचा समभाग १,३७५.१० रुपयांवर बंद झाला. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल १३,४५,१४०.०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या स्थानावर कायम राहिली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कंपनीचा समभाग २,१५५.५० रुपयांवर बंद झाला.

या आठवड्यातील सर्वात मोठी उलथापालथ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर पाहायला मिळाली. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार तेजीमुळे बँकेचे बाजार भांडवल वाढून १३,०४,५४३.९५ कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेने १३ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करत रिलायन्स समूहाची अलीकडेच सूचिबद्ध झालेली कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सला मागे टाकले आणि पुन्हा एकदा तिसरे स्थान मिळवले. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड १२,७६,३७१.६७ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह चौथ्या स्थानावर राहिली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा समभाग १,३८६ रुपयांवर बंद झाला.

बँकिंग क्षेत्रातील अन्य दोन प्रमुख कंपन्यांनीही या आठवड्यात उत्कृष्ट कामगिरी केली. आयसीआयसीआय बँक ११,७९,०४५.६७ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह पाचव्या स्थानावर कायम राहिली. शुक्रवारी या बँकेचा समभाग १,६४१ रुपयांवर बंद झाला. तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनेही (एसबीआय) १० लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याच्या गटातील आपले स्थान मजबूत ठेवले. १०,७५,३३८.१८ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह एसबीआय सहाव्या स्थानावर कायम राहिली. शुक्रवारी बँकेचा समभाग १,१६४.९५ रुपयांवर बंद झाला.

माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ८,५९,२९५.७९ कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह सातव्या स्थानावर राहिली. शुक्रवारी कंपनीचा समभाग २,३७५ रुपयांवर बंद झाला. बिगरबँकिंग वित्तीय क्षेत्रातील प्रमुख कंपनी बजाज फायनान्स ७,१०,०९१.५७ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह आठव्या स्थानावर राहिली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा समभाग १,१२० रुपयांवर बंद झाला.

पायाभूत सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) ५,७८,०२२.३५ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह नवव्या स्थानावर कायम राहिली. शुक्रवारी कंपनीचा समभाग ४,२०१ रुपयांवर बंद झाला. तर टॉप १० कंपन्यांच्या यादीतील दहाव्या स्थानावर मोठा बदल पाहायला मिळाला. अलीकडेच शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने ५,४९,५२४.२५ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह टॉप १० मध्ये आपले स्थान निश्चित केले. या बदलामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ५,१८,१४३.८१ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह टॉप १० मधून घसरून अकराव्या स्थानावर पोहोचले.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे मोठ्या बाजारमूल्याच्या बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक होत आहे. एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये मागील १५ व्यवहारांच्या सत्रांत झालेली २२ टक्क्यांची जोरदार वाढ आणि एनएसईचे सूचिबद्ध होणे यामुळे टॉप १० कंपन्यांचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. आगामी आठवड्यातही विदेशी भांडवलाचा ओघ आणि तिमाही आर्थिक निकालांच्या आधारे या दिग्गज कंपन्यांच्या बाजार भांडवलात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande