नागपुरात आकर्षक व्याजाचे आमिष, ५९ ठेवीदारांना २.७३ कोटींचा गंडा
पदवीधर महिला पतसंस्थेला टाळे ठोकून पदाधिकाऱ्यांचे पलायन अध्यक्षांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास नागपूर, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करून घेतल्यानंतर महिला पतसंस्थेच्य
प्रतिकात्मक एआय-निर्मित फोटो


पदवीधर महिला पतसंस्थेला टाळे ठोकून पदाधिकाऱ्यांचे पलायन

अध्यक्षांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

नागपूर, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करून घेतल्यानंतर महिला पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयालाच टाळे ठोकून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. न्यू शुक्रवारी महाल येथील पदवीधर महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत तब्बल ५९ ठेवीदारांचे २ कोटी ७३ लाख ८८ हजार ७८५ रुपये अडकल्याचा आरोप आहे. मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह १४ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची गुंतवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी या पतसंस्थेची स्थापना केली होती. याशिवाय त्यांच्या आणखी दोन संस्था असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. फिक्स्ड डिपॉझिट आणि दैनंदिन बचत संकलन अशा विविध योजनांमध्ये आकर्षक व्याज देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. अमरावती येथील सूर्यकांत शुक्ला (३८) यांच्यासह एकूण ५९ गुंतवणूकदारांनी संस्थेत तब्बल २ कोटी ७३ लाख ८८ हजार ७८५ रुपये जमा केले.

मुदत संपली, मात्र ठेवीदारांच्या हाती निराशाच

गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संस्थेकडे पैसे उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पदाधिकाऱ्यांनी रक्कम परत देण्यास असमर्थता दर्शविली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त ठेवीदार संस्थेच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यानंतर कार्यकारी अधिकारी संदीप पोटे, अध्यक्षा ममता पोटे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला टाळे लावून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित तीनही संस्थांची कार्यालये सध्या बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा

या प्रकरणी कार्यकारी अधिकारी संदीप पोटे, अध्यक्षा ममता पोटे, उपाध्यक्षा गीता सातपुते, जया गडेकर, सचिव सविता अंबाडकर यांच्यासह संचालक माधुरी बावणकर, जयश्री वाघमारे, मीनल नितीन, गीता गायकवाड, मनीषा श्रीराव, दीपाली गौणे, पूजा पाटील, जितेंद्र गडेकर आणि भोजराव गायकवाड यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आर्थिक गुन्हे शाखेकडून पैशांच्या व्यवहाराची तपासणी

गुंतवणुकीची रक्कम नेमकी कुठे वळविण्यात आली, ठेवीदारांकडून जमा झालेल्या पैशांचा वापर कसा करण्यात आला आणि या प्रकरणात आणखी किती गुंतवणूकदारांची रक्कम अडकली आहे, याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अडकलेली रक्कम परत कधी मिळणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उभा ठाकला आहे.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande