
विद्यार्थ्याला मुलीचे कपडे घालून प्रपोज करण्यास भाग पाडले
उष्टे अन्न खाऊ घालत मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत छळले
नागपूर, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ५५२ वा क्रमांक पटकावणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला नागपुरातील शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालय व रुग्णालयात (जीडीसीसी) रॅगिंगच्या नावाखाली अमानुष छळाला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वरिष्ठ विद्यार्थ्यांनी या नवागत विद्यार्थ्याला मुलीचे कपडे घालण्यास, सहकारी विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास, उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे. अश्लील शेरेबाजी, गैरवर्तन, अनुचित स्पर्श आणि जीवे मारण्याच्या धमक्यांसह मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत त्याचा छळ करण्यात आल्याची तक्रार अजनी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणाची महाविद्यालयीन चौकशी करण्यात आली असून, प्राथमिक अहवालानंतर रॅगिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले आहे.
नीटमध्ये देशात ५५२ वा क्रमांक, तरीही रॅगिंगचा सामना
तक्रारदार विद्यार्थी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा तालुक्यातील कमहरिया गावचा रहिवासी आहे. नीट परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ५५२ वा क्रमांक मिळविल्यानंतर त्याला सामान्य प्रवर्गातून नागपूरच्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. २६ ऑक्टोबर रोजी तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहण्यासाठी आला. मात्र, पहिल्याच रात्री त्याला कथित रॅगिंगच्या भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले.
मुलींचे कपडे घालून प्रपोज करण्याची जबरदस्ती
तक्रारीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास तो बॅचमधील अन्य विद्यार्थ्यांसोबत खोली क्रमांक १०४ मध्ये असताना काही वरिष्ठ विद्यार्थी तेथे आले. स्वतःला वर्गप्रतिनिधी (सीआर) सांगणाऱ्या एका वरिष्ठाने त्याला टोपी काढून डोके खाली घालण्यास सांगितले. त्यानंतर कोंबडा होणे, कपडे काढणे अशा प्रकारांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. याचदरम्यान अश्लील टिप्पण्या, शिवीगाळ आणि अनुचित स्पर्शही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मुलींचा पोशाख घालून दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
उष्टे अन्न खाण्यास भाग पाडले, जीवे मारण्याची धमकी
रॅगिंगचे प्रकार एवढ्यावरच थांबले नाहीत. दारूची बाटली आणणे, खोली स्वच्छ करणे, अश्लील व्हिडिओ दाखविणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकारही घडल्याचे विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ आणि नाश्त्यासाठी जाण्यास मनाई करण्यात आली. वर्गात जाताना डोके खाली घालून रांगेत चालण्यास सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर दुपारी मेसमधील उरलेले उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पुढील शिक्षण करू देणार नाही, अशी धमकीही वरिष्ठांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मानसिक त्रास असह्य; आईला फोन करून गावी परतला
सततच्या छळामुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली गेला. अखेर त्याने आईला फोन करून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच दिवशी वसतिगृह सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्याच टप्प्यावर आलेल्या या अनुभवामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ विद्यार्थ्याने यापूर्वीच महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार करून अँटी रॅगिंग समिती आणि पथकाकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर ते देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या मावशीने केला आहे. कुटुंबीयांनी यूजीसीची अँटी रॅगिंग हेल्पलाइन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडेही तक्रारी केल्या आहेत. तसेच, एका खोलीत दोन ते तीन विद्यार्थ्यांची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात सुमारे १४ विद्यार्थी राहत असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हाकलले
दरम्यान, या प्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या प्राथमिक अहवालानुसार तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले आहे. तक्रारदार विद्यार्थी केवळ एक दिवस वसतिगृहात राहिला होता. आता पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने पुढील तपास आणि कारवाई पोलिसांकडून केली जाईल.
उच्च गुणवत्तेच्या आधारे वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालाच रॅगिंगचा सामना करावा लागल्याने महाविद्यालयीन वसतिगृहांमधील नवागत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ वसतिगृहातून बाहेर काढण्यापुरती कारवाई न राहता, या प्रकारातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis