
कामठी, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवार आजही सक्रिय आहेत. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रुची घेत असतात. त्यांची निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आयुष्यात कुठेही थांबणार नाहीत, तर काही ना काही सकारात्मक काम करीत राहतील असे सांगत त्यांनी पवारांच्या उत्तम आरोग्याची कामना केली. यावेळी त्यांनी कोयनेचे पाणी, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि आगामी कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुंबईसह दुष्काळी भागांना दिलासा देण्याचा विचार
कोयना धरणातील पाण्याच्या नियोजनावरून सुरू असलेल्या चर्चेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. कोयनेच्या पाण्याचा अभ्यास न करता अनेकजण यावर भाष्य करीत असल्याचे सांगत त्यांनी विनाकारण वाद निर्माण करू नये, असा सल्ला दिला. सध्या कोयनेचे सुमारे 60 टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात असल्याचे सांगून या पाण्याचा उपयोग मुंबई, कोकण आणि दुष्काळी भागांसाठी करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे पाणी मुंबईकडे आणता आले, तर कोकणातील अनेक जलप्रकल्पांवरील ताण कमी होईल. मुंबईलाही पाणी उपलब्ध करून देता येईल आणि कोकणालाही त्याचा लाभ होऊ शकेल. याशिवाय सातारा आणि सांगलीच्या दुष्काळी भागातही पाणी पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
कोयना प्रकल्प अस्तित्वात आल्यापासून पाणी समुद्रात वाहून जात आहे; मात्र आजवर या पाण्याच्या संभाव्य वापराबाबत गांभीर्याने विचार झाला नसल्याचे नमूद करीत त्यांनी यापूर्वीच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली. आता या पाण्याच्या वापराबाबत विचार सुरू असताना काही जणांकडून वाद निर्माण केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मात्र, या प्रकल्पाबाबत अद्याप सविस्तर अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. किती पाणी उचलता येईल, त्याचे तांत्रिक नियोजन कसे असेल, याची तपासणी केली जाईल. सर्व संबंधितांची मते जाणून घेऊन त्यांना प्रकल्पाची भूमिका समजावून सांगण्यात येईल. त्यामुळे अभ्यास पूर्ण होण्यापूर्वी विनाकारण विरोध किंवा वाद निर्माण करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
परीक्षा पद्धतीत गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदा दरम्यान, राज्यातील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने परीक्षा सुधारणांबाबतचा आणखी एक अहवाल सरकारला सादर केला आहे.परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, परीक्षा शुल्काचा आर्थिक भार कोणावरही पडू नये यासाठी शुल्क परत करण्याची व्यवस्था करणे, तसेच यापूर्वी करण्यात आलेला परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.या शिफारशींच्या अनुषंगाने याच विधिमंडळ अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी