
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या घटनेभोवती पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजीव गांधी यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक कपात करण्यात आली होती, जेणेकरून त्यांची हत्या करणे शक्य होईल, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आपल्या वडिलांच्या सुरक्षेबाबत आपण आई सोनिया गांधी यांना आधीच गंभीर इशारा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गींग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित संवादातील एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. दिल्लीत 16 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकावरील चर्चेदरम्यान राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा विषय निघाला आणि राहुल यांनी त्यावेळचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग सांगितला.राहुल गांधी म्हणाले की, वडिलांच्या सुरक्षेबाबत परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव त्यांना झाली होती. सुरक्षा व्यवस्था पुन्हा बहाल केली नाही, तर आपल्याला लवकरच वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी परतावे लागू शकते, अशी भीती त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. राहुल यांनी बिहार दौऱ्याचा उल्लेख करत या प्रसंगाला अंतिम इशारा असे संबोधले.
सोनिया गांधी यांनीही या चर्चेत बिहार दौऱ्यातील धक्कादायक अनुभव सांगितला. त्या वेळी राजीव गांधी विरोधी पक्षाचे नेते होते. राहुल गांधी त्यांच्यासोबत बिहार दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात राजीव गांधी उघड्या जीपमधून प्रवास करत असताना त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली होती. हा अनुभव अत्यंत भीतीदायक असल्याचे सोनिया यांनी सांगितले. या दौऱ्यावरून घरी परतल्यानंतर राहुल यांनी वडिलांच्या सुरक्षेबाबतची चिंता आईसमोर व्यक्त केली होती. सोनिया यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी त्यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, 'आई, पप्पांच्या सुरक्षेसाठी आपण काही केले नाही, तर मला माहीत आहे की मी लवकरच त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असेन.'इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत सोनिया गांधी प्रचंड चिंतेत असायच्या. घराभोवतीच्या काटेरी तारांची तपासणी करण्यापासून ते सुरक्षा रक्षक जागे आहेत की नाही, याची खात्री करण्यापर्यंत त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असत, असे प्रियंका वाड्रा यांनी सांगितले. वडिलांच्या पावलांचा आवाज ऐकल्याशिवाय आपल्याला झोप लागत नसे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सुरक्षेच्या कडेकोट व्यवस्थेवरून राजकीय टीका
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. ते अनेक वर्षे बुलेटप्रूफ जॅकेट वापरत असत. मात्र, त्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर विरोधकांकडून टीकाही केली जात होती. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या व्ही. पी. सिंह यांनी कमांडोंच्या ताफ्यात राहणारे राजीव गांधी सामान्य जनतेपासून दूर गेले असल्याची टिप्पणी केली होती. राजीव गांधी यांनी ५ मे १९९१ रोजी बिहारमधील सभेत आपल्या सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत भाष्य केले होते. टाइम मासिकाने नोंदवलेल्या त्यांच्या वक्तव्यानुसार, पंतप्रधान झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेने आपल्याला जणू आपल्या ताब्यात घेतले होते, असे त्यांनी म्हटले होते. धोका अजूनही कायम आहे; मात्र प्रचार करायचा की स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायची, असा पेच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
अखेर श्रीपेरंबदूरमध्ये घडली दुर्दैवी घटना
राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत व्यक्त झालेली ही भीती अखेर दुर्दैवाने खरी ठरली. २१ मे १९९१ रोजी तमिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या राजीव गांधी यांची आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली. एका महिलेने चंदनाचा हार अर्पण करण्यासाठी त्यांच्यासमोर वाकताच स्फोट झाला. या हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते अवघ्या ४६ वर्षांचे होते.राहुल गांधी यांनी केलेला सुरक्षा हटवण्याचा दावा आणि सोनिया गांधी यांनी सांगितलेले अनुभव यामुळे राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी