
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नेरळ पोलिसांनी ममदापूर येथे कारवाई करून दोन किलो गोवंशीय मांस जप्त केले असून, याप्रकरणी बादशाह मुस्तफा शेख याला अटक केली आहे. ७०० रुपये किमतीचे हे मांस त्याने दामत येथील मिरान नजे याच्याकडून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलकप कॉलेज रोडवरील सिल्व्हर आर्च अपार्टमेंटजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बादशाह शेख आणि मिरान नजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बादशाह शेख याला रात्री बाराच्या सुमारास अटक करण्यात आली. जप्त केलेले मांस नियमानुसार नष्ट करण्यात आले.
दरम्यान, दामत-बांदिवली परिसरातील शेलू रेल्वे स्थानकाजवळील नाल्यालगत जनावरांची कत्तल होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणी मांस कापण्याचा लाकडी ठोकळा आणि नाल्यात मांसाचे अवशेष आढळल्याचे सांगण्यात येते. या कथित कत्तलीच्या ठिकाणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)