
मृतदेहाच्या अंत्यसंस्कारस्थळी नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली आढळली
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली कैद; कारवाईची मागणी
जळगाव, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : जळगाव शहरातील नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहाच्या ठिकाणी नारळ, लिंबू, अंडी, दारूची बाटली आणि अगरबत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वस्तू ठेवून काही संशयास्पद विधी करण्यात आल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित प्रकार स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तुकारामवाडी परिसरात वास्तव्यास असलेले अनिल तुळशीराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर नेरी नाका येथील स्मशानभूमीत हिंदू रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे भाचे रवींद्र चौधरी हे स्मशानभूमीत पाहणी करण्यासाठी गेले असता अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी नारळ, लिंबू, अंडी, दारूची बाटली आणि अगरबत्ती अशा वस्तू आढळून आल्या.
या प्रकाराची माहिती घेतली असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयास्पद वस्तू घेऊन अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी हालचाली करताना तसेच काही वस्तू जळत्या ठिकाणी टाकताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे चौधरी कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकारामागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर