
लातूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : शेतकरी बांधवांसाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी पुढाकार घेतला असून
उदगीर विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकरी आणि शेतमजुरांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागासह संबंधित सर्व विभागांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तात्काळ सुरू करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा, असे निर्देश माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
येथील मंगळवारी उदगीर येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद गटनेते दिलीप मटके, नगरसेवक सचिन हुडे, प्रा. शाम डावळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसभापती विकी भोसले, सर्जेराव भांगे, भुमी अभिलेख उपाधिक्षक रविंद्र कोरे, नगरपालीकेचे मुख्याधिकारी श्री. दिपक मोरे, उपअभियंता श्री जे.एल. उगीले, शाखा अभियंता अलका राठोड, धनराज नादरगे, प्रकाश बिरादार, कमलाकर फुले आदी यावेळी उपस्थित होते.
मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना वेळेत मिळणे गरजेचे आहे. विविध योजनांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांना अनुदान व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.
विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचतो की नाही, याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत विविध विभागांच्या योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका आमदार संजय बनसोडे यांनी यावेळी मांडली.
मातोश्री पाणंद रस्यासाठीच्या अडचणी समन्वयाने दुर करा
उदगीर मतदारसंघात जवळजवळ शंभर किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.जास्तीत जास्त शेतरस्याची कामे झाली पाहीजेत. शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतमालाची वाहतुक करता आली पाहिजे. या रस्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी पंचायत समिती व महसूल विभागाच्या समन्वयाने दुर करुन ही कामे झाली पाहीजेत. यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन रस्ते करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis